राज्यात पावसाच्या जोरदार सरी; सर्वाधिक ७८ मिमी पावसाची नोंद, कुठे किती पाऊस झाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:17 IST2026-05-19T14:16:11+5:302026-05-19T14:17:11+5:30
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगटासह जोरदार पाऊस पडला.

राज्यात पावसाच्या जोरदार सरी; सर्वाधिक ७८ मिमी पावसाची नोंद, कुठे किती पाऊस झाला?
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राजधानी शहरासह मुरगाव, म्हापसा आणि जुने गोवे या भागात सोमवारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगटासह जोरदार पाऊस पडला. रात्री उशिराही पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. गोवा हवामान वैज्ञानिक केंद्राने जारी केलेल्या ताज्या बुलेटीननुसार, राज्यातील केपे तालुक्यात सर्वाधिक ७८ मिमी म्हणजेच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
याशिवाय धारबांदोडा येथे ४८.२ मिमी, काणकोणमध्ये ४९.२ मिमी, मडगाव येथे ४७.२ मिमी आणि सांगेम येथे ४५.३ मिमी इतक्या मध्यम पावसाची नोंद झाली आहे. तर म्हापसा, जुने गोवे, मुरगाव आणि पणजी भागात हलका पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव, कोमोरीन आणि अंदमान समुद्रासह संपूर्ण अंदमान निकोबार बेटसमूहामध्ये पुढे सरकला आहे.
पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. केरळमध्ये २६ मेच्या सुमारास मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोव्यात सध्या पुढील काही दिवस सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगटाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने मंगळवारीही अशाच प्रकारच्या पावसाचा अंदाज वर्तवला असून दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी ७दिवसांत राज्याच्या कमाल तापमानात ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किमान तापमानात २६ ते २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, ज्यात मोठा बदल संभवत नाही.
या अचानक आलेल्या पावसामुळे आणि वादळामुळे सखल भागात पाणी साचणे, रस्त्यांवर पाणी जमा होणे, वाहतूक कोंडी, कमकुवत झाडे किंवा बांधकामे कोसळणे तसेच वीज पुरवठा खंडित होणे अशा समस्या उद्भवू शकतात. हवामान खात्याने नागरिकांना आणि पर्यटकांना खराब हवामानाच्या काळात सुरक्षित आश्रय घेण्याचे, झाडांखाली उभे न राहण्याचे आणि समुद्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच तीव्र पावसाच्या काळात फेरी सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात येऊ शकते.