गुजरात सीआयडीचा गोव्यात मोठा छापा; ९ जणांना अटक, आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचे धागेदोरे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:48 IST2026-04-15T07:47:47+5:302026-04-15T07:48:56+5:30
राज्याच्या विविध भागांत टाकलेल्या छाप्यांमध्ये ९ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गुजरात सीआयडीचा गोव्यात मोठा छापा; ९ जणांना अटक, आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचे धागेदोरे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशभरात खळबळ माजवणाऱ्या ७७ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणाचे कनेक्शन आता गोव्यापर्यंत पोहोचले असून, गुजरात सीआयडीने गोव्यात मोठी कारवाई केली आहे. सायबर फसवणुकीच्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी गोव्याचा वापर 'सेफ हेवन' म्हणून केला जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. राज्याच्या विविध भागांत टाकलेल्या छाप्यांमध्ये ९ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गुजरात सीआयडीच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ने केलेल्या या कारवाईत एकूण १६ जणांना अटक झाली. यापैकी निम्म्याहून अधिक आरोपी गोव्यातून पकडले गेले आहेत. हे आरोपी 'म्युल' बँक खात्यांद्वारे फसवणुकीची रक्कम फिरवत होते. संशयितांनी तब्बल २६० हून अधिक बनावट बँक खाती तयार केली होती. त्यातून ३७५ सायबर गुन्ह्यांमधील ७७ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
जप्त केलेल्या लॅपटॉप, मोबाइल तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून दुबईसह इतर परदेशातील व्यक्तींच्या संपर्कात होते. आता या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचे धागेदोरे तपासले जात आहेत.
अशी झाली कारवाई
गुजरात पोलिसांकडून गोवा, बडोदा आणि पालनपूरमध्ये एकाच वेळी छापे गोव्यात अटक केलेल्या संशयितांकडून मोबाईल, चेकबुक्स, राऊटर, सिमकार्ड, पेन ड्राईव्ह आणि डेबिट काईस यांसह क्यूआर कोडचे साहित्य जप्त केले.
संशयित स्वतःच्या आणि इतरांच्या नावावर खाती उघडून त्याची माहिती ऑनलाईन गेमिंग आणि सायबर घोटाळेबाजांना पुरवत होते. तपासात तीन बनावट कंपन्यांचे अस्तित्वही समोर आले आहे.