समुद्रकिनारी पर्यटनाला जाताय, सावधान! आनंदयात्रा शोकयात्रा बनू नये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 12:59 AM2019-12-01T00:59:03+5:302019-12-01T00:59:12+5:30

पर्यटन हंगाम सुरू असल्यामुळे गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

Going to beaches, beware! A joyful journey should not be a bereavement | समुद्रकिनारी पर्यटनाला जाताय, सावधान! आनंदयात्रा शोकयात्रा बनू नये

समुद्रकिनारी पर्यटनाला जाताय, सावधान! आनंदयात्रा शोकयात्रा बनू नये

Next

- वासुदेव पागी

पणजी : सहल किंवा ज्याला आपण इंग्रजीत टूर असे म्हणतो ती एक आनंदयात्रा असते आणि ती तशीच व्हावी. काही शुल्लक चुकांमुळे जेव्हा ही आनंदयात्रा शोकयात्रा बनते, तेव्हा आयुष्यात कधी पुन्हा सहलीला जाण्याचा विचारही मनाला शिवणार नाही. गोव्यासह कोकण भागात पर्यटक म्हणून येणाऱ्या अनेक लोकांच्या वाट्याला ही शोकयात्रा आलेली आहे. गोव्यात गेल्या ३ वर्षांत १०८ पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे, तर ११६६ जणांना बुडताना वाचविण्यात आले आहे.
पर्यटन हंगाम सुरू असल्यामुळे गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सिंधुदूर्ग किल्ला, तारकर्ली, वेंगुर्ला, रत्नागिरी, गणपती पुळे, मुरुड-जंजिरा, अलिबाग येथील समुद्रकिनारे पर्यटनास प्रसिद्ध आहेत़ दिवाळीच्या सुटीनंतर आता पर्यटकांचे मोठ्या प्रमाणावर लोंढे येणार आहेत, ते ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी. गोव्यात येणारे बहुतेक ८५ टक्क्यांहून अधिक पर्यटक हे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटायला येत असतात. त्यात देशी, तसेच विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात असतात.
मागील ५ वर्षांत देशी पर्यटकांचा ओघ प्रचंढ वाढला आहे. त्यात महाराष्ट्र व दिल्लीतील पर्यटक मोठ्या प्रमाणावर असतात. या पर्यटकांची सुरक्षा हा दर वर्षी चिंतेचा विषय बनून जातो. सुरक्षा ही काही अतिरेकी धोक्याची नाही, तर पर्यटक स्वत: करीत असलेल्या चुकांमुळे व बेजबाबदार वर्तनामुळे असते.
‘दृष्टी’ची सुरक्षा : गोव्यातील सर्व समुद्रकिनाºयांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘दृष्टी’ या खासगी संस्थेचे जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. एक उंच टॉवर उभारून तेथून हे जीवरक्षक समुद्रात उतरलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवून असतात आणि कुणी संकटात सापडला तर धावून जातात. शीघ्रगतीने धाव घेण्यासाठी त्यांना वाहनही पुरविण्यात आले आहे. शिवाय, संपूर्ण किनारपट्टी क्षेत्र एक एका जीवरक्षकाला लक्ष ठेवण्यासाठी निश्चित करून दिलेले असते. समुद्रात पोहण्यासाठी हे जीवरक्षक तरबेज असतात व त्यांना विशेष साधनेही दिलेली असतात. आतापर्यंत मागील ११ वर्षांत ४ हजार ३८ लोकांचा जीव त्यांनी वाचविला आहे. चालू वर्षातच आतापर्यंत ११ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर ४३५ जणांना बुडताना वाचविण्यात आले आहे. नशा करून पाण्यात जाऊ नका, असे वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीत आणि नशेत ते कुठे वाहून जातात ते त्यांनाच कळत नाही, अशी माहिती कलंगुट येथील एका जीवरक्षकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

काय काळजी घ्याल?
झेंड्यांचे संकेत ओळखा
गोव्यातील किनाºयांवर अनेक ठिकाणी लाल, पिवळे आणि पिवळे अधिक लाल, असे झेंडे लावलेले दिसतील. दोन लाल झेंड्यांमधील जागा ही पोहण्यासाठी धोकादायक आहे. त्या जागेत अंडरकरंट असू शकतो किंवा धोकादायक दगडही असू शकतात किंवा इतर धोके असू शकतात. दोन पिवळ्या झेंड्यांमधील जागा ही कमी धोक्याची आहे, तर दोन अर्धे लाल आणि अर्धे पिवळ्या झेंड्यांमधील जागा ही पोहण्यासाठी अधिक सुरक्षित आहे, असा त्याचा अर्थ असतो. दृष्टी जीवरक्षकांकडून समुद्राची पाहणी करून ते झेंडे लावलेले असतात.

धोकादायक अंडरकरंट
समुद्राला जशी भरती-ओहोटी असते; तसेच धोकादायक अंडरकरंटही असतात. पाण्याच्या वरच्या पातळीवर पाणी संथ दिसते; परंतु खालून पाण्याचा जोरदार प्रवाह समुद्राकडे ओढून नेणारा असतो.
सततच्या लाटांमुळे वाळूची विशिष्ट्य अशी रचना झाली, तर असे करंट तयार होतात व ते सहजासहजी
ओळखणेही कठीण असतात.

देशी पर्यटक अधिक बुडाले
पर्यटक म्हणून आले व समुद्रात बुडून ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशा पर्यटकांत देशी व विदेशीही पर्यटक आहेत. विदेशी पर्यटक हे बहुतेक समुद्रात पोहण्यात तरबेज असतात. त्यामुळे विदेशी पर्यटकांची बुडून मरण्याची संख्या अगदीच कमी आहे. समुद्र हा ज्या लोकांना नवीन आहे आणि समुद्राच्या लाटांचा व किनाºयाचा ज्यांना अनुभव नाही, अशा पर्यटकांसाठी किनारे धोकादायक ठरले आहेत. ८० टक्क्याहून अधिक हे देशी पर्यटक बुडालेले आहेत. त्यातही दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून आलेल्यांची संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी आवश्यक पर्यटन सुविधा अजूनही नाही़ त्यामुळे पर्यटकांना सूचना असलेले फलक फक्त लावलेले असतात़ आता शाळा, महाविद्यालयांच्या सहली सुरू होतील़

अनेक सहली या समुद्रकिनारी नेल्या जातात़ एकाचवेळी ५० हून अधिक विद्यार्थी असताना सर्वांवर लक्ष ठेवणे शक्य होतेच असे नाही़ जलतरण तलावात पोहणारे काहीजण अतिआत्मविश्वासाने समुद्रात आतवर जातात व दुर्दैवाने ते लाटांच्या माºयात सापडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत़ पुण्यातील एका शाळेतील काही मुलांबाबत दुर्दैवी दुर्घटना घडली होती़ त्यात काही मुलांना जीव गमवावा लागला होता़ समुद्रकिनारी असे प्रसंग दर वर्षी होत असतात़

पर्यटकांनी समुद्रात पोहण्याची जागा अशाच ठिकाणी निवडायला हवी की, जेथून जीवरक्षकाची नजर असेल. जीवरक्षकांच्या सूचनेचे पालन व्हावे. ते जे सांगतात ते आपल्या सुरक्षेचे आहे हे लक्षात घ्यावे, असे आम्ही पर्यटकांना आवाहन करतो़ - रवी शंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, दृष्टी

Web Title: Going to beaches, beware! A joyful journey should not be a bereavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा