गौतम खट्टरला आज सायंकाळपर्यंत गोव्यात आणणार; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न केल्याने आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:50 IST2026-04-26T10:50:10+5:302026-04-26T10:50:49+5:30

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कुल्लू-हिमाचलमधून अटक

gautam Khattar to be brought to goa by this evening surprised that he did not apply for anticipatory bail | गौतम खट्टरला आज सायंकाळपर्यंत गोव्यात आणणार; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न केल्याने आश्चर्य

गौतम खट्टरला आज सायंकाळपर्यंत गोव्यात आणणार; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न केल्याने आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फरार असलेला गौतम खट्टर अखेर गोवापोलिसांच्या ताब्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून शुक्रवारी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. ट्रान्झिट रिमांड मिळवून पोलीस पथक त्याला गोव्याकडे घेऊन रवाना झाले असून, आज उशिरा किंवा रविवारी पहाटेपर्यंत त्याला गोव्यात आणले जाणार आहे.

खट्टरला अटक झाल्याने प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे. त्याच्या वक्तव्यामागे कोणाचा दबाव किंवा चिथावणी होती का, याचा शोध पोलिस घेणार आहेत. धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाईचा इशारा गृहखात्याने दिल्याने या प्रकरणातील पुढील हालचालींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

वास्को येथील परशूराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खट्टरने केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात तीव्र संताप उसळला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती.

असा सापडला खट्टर...

पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास देईकर यांच्या पथकाने उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात शोधमोहीम राबवली. मोबाईल बंद ठेवूनही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले. कुल्लूतील मलाणा परिसरातील एका दुर्गम टेकडीवर तो लपल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करून त्याला ताब्यात घेण्यात आले. गोव्यात आणल्यानंतर खट्टरची सखोल चौकशी होणार असून, या वक्तव्यामागील संभाव्य सूत्रधारांचा शोध घेतला जाणार आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

खट्टरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न केल्याने आश्चर्य

जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवलेले युट्युबर गौतम खट्टर यांनी अद्याप अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्याच्या प्रकरणात गोव्यात यापूर्वी अनेकदा संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला असताना खट्टर यांनी जामिनला जाण्याऐवजी 'फरार' राहण्याचा मार्ग निवडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवणारी अनेक प्रकरणे यापूर्वी घडली आहेत. माजी संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्याचप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कथित वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूंना फादर बोलमॅक्स परेरा यांना देखील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. 

अशा प्रकरणांमध्ये सहसा तपासाला सहकार्य करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन दिला जातो. असे असतानाही त्याने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला नाही. हिमाचल प्रदेशात जाऊन खट्टरला पकडल्यामुळे त्याची आता अटकपूर्व जामीन मिळविण्याची संधी गेली. आता त्याला केवळ नियमित जामीनसाठी अर्ज करावा लागणार आहे.
 

Web Title : धार्मिक अपराध में गौतम खट्टर गोवा में गिरफ्तार; जमानत याचिका नहीं

Web Summary : धार्मिक टिप्पणी के लिए हिमाचल में गिरफ्तार गौतम खट्टर जल्द गोवा पहुंचेंगे। पुलिस संभावित भड़काने वालों की जांच कर रही है। इसी तरह के मामलों में मिसाल के बावजूद, उनकी अग्रिम जमानत के लिए आवेदन करने में विफलता आश्चर्यजनक है। उसे अदालत में पेश किया जाएगा।

Web Title : Gautam Khattar Arrested in Goa for Religious Offense; Bail Unapplied

Web Summary : Gautam Khattar, arrested in Himachal for offensive remarks, will arrive in Goa soon. Police are investigating potential instigators. His failure to apply for anticipatory bail is surprising, given precedents in similar cases. He will be presented in court.