दोस्ती बदलली दुश्मनीत; RG अध्यक्ष मनोज परब विरुद्ध आमदार वीरेश बोरकर संघर्ष अधिक तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:35 IST2026-05-15T12:34:48+5:302026-05-15T12:35:10+5:30
पक्षावरील वर्चस्वाच्या संघर्षातून एकेकाळची दोस्ती आता दुश्मनीत बदलल्याचे चित्र आहे.

दोस्ती बदलली दुश्मनीत; RG अध्यक्ष मनोज परब विरुद्ध आमदार वीरेश बोरकर संघर्ष अधिक तीव्र
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: रिव्होल्यूशनरी गोवन पक्ष (आरजी) पक्षातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब, सरचिटणीस विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांनी आता एकमेव आमदार विरेश बोरकर यांनाच टार्गेट केल्याचे दिसते. तर आमदार बोरकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. पक्षावरील वर्चस्वाच्या संघर्षातून एकेकाळची दोस्ती आता दुश्मनीत बदलल्याचे चित्र आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मनोज परब यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले. त्यानंतर बोरकर समर्थक आणि परब समर्थक यांच्यात सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या घडामोडींमुळे विरेश बोरकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, आरजीच्या सांतआंद्रे ब्लॉकने आमदार वीरेश यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा निषेध केले. पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांना पत्र पाठवत सोशल मीडियावर जे काही सुरू आहे, त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पत्रात मनोज परब, अजय खोलकर आणि विश्वेश नाईक यांनी आमदार बोरकर, त्यांचे पीएस लिसिओ रॉनकॉनसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांविरोधात केलेले आरोप 'बिनबुडाचे आणि बदनामीकारक' असल्याचे म्हटले आहे. बनवाट सोशल मीडियावरून अकाउंट्सद्वारे त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचाही आरोप केला.
सांतआंद्रे ब्लॉकने पक्षातील मतभेद मिटविण्यासाठी प्रयत्न झाल्याचे सांगत, त्यातून सकारात्मक तोडगा निघाला नसल्याचे नमूद केले. मात्र, या घडामोडींनंतरही पक्षाशी बांधिलकी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'३९ अ'चा उल्लेख
आमदार वीरेश यांनी गुरुवारी सकाळी 'पीस' असा उल्लेख करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यानंतर काही वेळात त्यांनी 'आधी ३९ अ चा मुद्दा समोर आला, आता त्याचे साइड इफेक्ट्स दिसत आहेत' अशी पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा झाली.
वीरेश बोरकर 'आरजी'चे अध्यक्ष?
'आरजी'मधील वाढत्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार वीरेश बोरकर यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर 'रिव्होल्यूशनरी गोवन्स'चे अध्यक्ष' अशी नोंद दिसल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सध्या मनोज परब हे पक्षाध्यक्ष असतानाच बोरकर यांनी स्वतःच्या प्रोफाइलवर अशी ओळख अपडेट केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बदलामुळे आरजीमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हे प्रोफाइल अपडेट पूर्वीपासून असल्याचे आरजीच्या काही कार्यकर्त्याकडून सांगण्यात आले.
रॉनकॉन म्हणाले, मी काय केले?
दरम्यान, लिसिओ रॉनकॉन यांनी गुरुवारी प्रथमच आरजी अध्यक्ष मनोज परब यांनी केलेल्या आरोपांना सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिले. 'भी कोणाचे ब्रेनवॉश केले आणि कसे? मी धार्मिक कार्ड खेळले? मी वीरेशच्या पर्सनल ई मेल लीक केल्या? तुमच्या या आरोपांचा सोर्स सांगा' अशी पोस्ट केली आहे.
वीरेश समर्थकांवर टीका
मनोज परब यांनी गुरुवारी 'आदित्य देसाई, वीरेश बोरकर आणि गँग' असा उल्लेख करत एक पोस्ट केली. आपल्यावर वैयक्तिक टीका करणारा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो या पोस्टमध्ये 'टॅग' करत आमदार बोरकर आणि त्यांच्या समर्थकांवर त्यांनी अतिशय बोचरी टीका केली.
'पिस' विरुद्ध 'पिसेस'
दरम्यान, वीरेश बोरकर यांनी फेसबुकवर केवळ 'पीस' असा एक शब्द लिहून सूचक पोस्ट केली. मात्र, या पोस्टनंतरही वाद आणखी चिघळला. आरजी खजिनदार अजय खोलकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना, 'यूअर सो कॉल्ड पीस हॅज टर्न इनटू पिसिस' असे म्हणत बोरकर यांच्या पोस्टवर अप्रत्यक्ष टीका केली. यालाच जोडून सरचिटणीस विश्वेश नाईक यांनीदेखील आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की 'जर तुम्हाला खरोखर शांतता हवी असेल, तर आगामी बैठकींना चर्चेसाठी या. तुम्हाला व्हॉट्सअॅप, ई-मेलद्वारे संदेश पाठवले आहेत. किमान त्याला उत्तर द्या.'
विश्वेश यांचा भावनिक संदेश
पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनीही पोस्टद्वारे भावनिक आवाहन केले आहे. 'पक्ष वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. फोन, ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे संवादाचा प्रयत्न केला. जगभरातील गोमंतकीयांना आरजी पक्ष जिवंत राहावा असे वाटते. 'खोट्या फेसबुक पेजेस, आदित्य देसाई यांनी प्रसारीत केलेल्या अफवा आणि लिसिओकडून वीरेश यांच्या स्टाफमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न यामुळे स्थिती गुंतागुंतीची झाली आहे.