परीक्षेतील गोंधळ विद्यार्थ्यांच्या जीवावर; मानसिक ताणामुळे पालकही हवालदिल, एकाने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:35 IST2026-05-14T12:35:18+5:302026-05-14T12:35:50+5:30
या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळ हादरले आहे.

परीक्षेतील गोंधळ विद्यार्थ्यांच्या जीवावर; मानसिक ताणामुळे पालकही हवालदिल, एकाने जीवन संपवले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि त्यानंतर परीक्षा रद्द होण्याच्या टांगत्या तलवारीमुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालक सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. दक्षिण गोव्यातील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळ हादरले आहे.
गोव्यातून सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी परीक्षा देऊन सध्या राज्याबाहेर किंवा परदेशात पर्यटनासाठी गेले आहेत. मात्र, एनईईटी परीक्षेतील गोंधळामुळे या विद्यार्थ्यांच्या आनंदावर पूर्णपणे विरजण पडले आहे.
अभ्यासाच्या पुन्हा पुस्तके हातात घेणे आणि मानसिकतेत जाणे अनेकांसाठी अशक्यप्राय आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्यासाठी रक्ताचे पाणी करणारे पालकही सध्या हतबल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून कोचिंग क्लासेस लावल्यानंतरही जर परीक्षेची विश्वासार्हता टिकत नसेल, तर दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवाल पालकांकडून केला जात आहे. अनेक पालक सध्या कायदेशीर लढाईकडे डोळे लावून बसले आहेत, तर काहींना आपल्या मुलांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी सतावत आहे.
याबाबत एका विद्यार्थ्याने संताप व्यक्त केला की, गोव्यासारख्या लहान राज्यातून मर्यादित जागांसाठी आमची मोठी स्पर्धा असते. अशा गोंधळामुळे आमची संधी हुकण्याची भीती वाटते. एकूणच, राज्यातील युवा पिढी सध्या एका मोठ्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली असून, सरकारने यावर ठोस आणि न्याय्य तोडगा काढण्याची नितांत गरज आहे.
जे काही झाले ते दुर्दैवी: मुख्यमंत्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
नीट परीक्षेचा पेपर फुटणे आणि त्यामुळे परीक्षाच रद्द करावी लागणे, हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणे वेदनादायी आहे,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले की, विद्यार्थी इतके कष्ट घेऊन तयारी करीत असतात, त्यांच्यासाठी हा मानसिक ताण आहे. यासंदर्भात परीक्षा अधिकारिणी कारवाई करीत आहे असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांमध्ये संतप्त भावना
या प्रकरणावर राज्यातील विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. एका विद्यार्थिनीने सांगितले की, दोन वर्षे रात्रंदिवस एक करून आम्ही अभ्यास केला. आता पुन्हा परीक्षा द्यायची मानसिकता उरलेली नाही. जे विद्यार्थी सध्या राज्याबाहेर आहेत, त्यांना तातडीने परत येणे आणि पुन्हा त्याच तीव्रतेने सराव करणे मानसिकदृष्ट्या थकवणारे आहे. दुसऱ्या एका विद्यार्थ्यांने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रशासकीय चुकांची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांना का दिली जात आहे? जर पुन्हा परीक्षा झाली, तर त्यात पारदर्शकता असेलच याची खात्री आहे का?
हा प्रकार दुर्दैवी : बेतकीकर
नीटचे पेपर फुटणे हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांनी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतो. परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत, असे विद्याभारती शिक्षण संस्थेचे क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी दिलीप बेतकीकर यांनी सांगितले.
नीट २०२६ परीक्षा रद्द होणे हे अत्यंत दुर्दैवी आणि वर्षानुवर्षे समर्पित वृत्तीने अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. जर पेपरफुटी आणि गैरप्रकाराचे आरोप खरे असतील, तर यात सामील असलेल्या सर्वांवर कठोर आणि जरब बसवणारी कारवाई झालीच पाहिजे. त्याचवेळी, प्रशासनाने आता ही फेरपरीक्षा पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि न्याय्य वातावरणात घेतली जाईल, याची खात्री द्यायला हवी, जेणेकरून विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण होईल. विद्यार्थी आणि पालक आधीच प्रचंड दडपणाखाली आहेत, त्यामुळे पुढील अनिश्चितता टाळण्यासाठी नवीन वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे. - व्यंकटेश प्रभूदेसाई, शिक्षण तज्ज्ञ.
परीक्षा पुन्हा द्यावी लागेल या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या
'यापुढे स्पर्धात्मक परीक्षा देणार नाही' अशी चिठ्ठी लिहून मायणा-कुडतरी येथे १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मूळ बेंगळुरू येथील हा मुलगा मडगावातील एका उच्च माध्यामिक विद्यालयात शिकत होता. या विद्यार्थ्याने नीटची परीक्षा दिली होती. ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार या भीतीने त्याने आपल्या राहात्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
या मुलाचे वडील घरी आल्यावर त्यांना मुलाने आत्महत्या केल्याचे आढळून आले. हे मूळ बंगळूरू येथील कुटुंब आहे. ते मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत राहात होते. या मुलाने नीट परीक्षा दिली होती. ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती कानावर पडताच त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्याने यापुढे आपण कदापिही स्पर्धा परीक्षा देणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे.
त्या मुलाची आई व बहीण बंगळूरू येथे गेली होती. तर वडील कामावर गेले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. मायणा कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून घेतले आहे. त्याचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. नीट परीक्षा रद्द झाल्याने ती पुन्हा द्यावी लागेल या तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास मायणा कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक करीत आहेत.