देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; १८ रोजी करणार 'मॉक ड्रिल', नियमांची होणार काटेकार अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:55 IST2026-04-15T07:54:32+5:302026-04-15T07:55:12+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; १८ रोजी करणार 'मॉक ड्रिल', नियमांची होणार काटेकार अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लहराई जत्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गृह खाते व राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत आहे का? याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी मंगळवारी दुपारी शिरगाव येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले की, जत्रा परिसरात केवळ मर्यादित दुकानांना परवानगी देण्यात येणार असून, त्याचे काटेकोर पालन केले जाईल. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता, रस्त्यावर कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
या पाहणीच्या वेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई, उपअधीक्षक श्रीदेवी, पोलिस निरीक्षक विजय राणे-सरदेसाई तसेच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गृह खात्याच्या आदेशानुसार जत्रा परिसरात कडक नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच भाविक, धोंड यांच्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे.
देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. जत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, मात्र शिस्त पाळून आणि कोणतीही गडबड न करता दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या वर्षी घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष दक्षता घेतली जात आहे. त्या अनुषंगाने १८ एप्रिल रोजी रात्री प्रत्यक्ष 'मॉक ड्रिल' घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी स्वतंत्र रांगा उभारण्यात येणार आहेत. तसेच पवित्र तळ्यात स्नान आणि होमकुंड दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
भाविकांसाठी सूचना
जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून शासनस्तरावर सातत्याने बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी शिस्त राखणे अत्यावश्यक आहे. कोणतीही धावपळ न करता, प्रशासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत दर्शन घ्यावे. सुरक्षेच्या दृष्टीने घालण्यात आलेल्या नियमांचे पालन केल्यास जत्रा सुरळीत व सुरक्षित पार पडण्यास मदत होईल, असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे.