शिरोडा माधव देवस्थानात महाविष्णू अनुष्ठान; पुरुषोत्तम मासानिमित्त सोहळ्याचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:41 IST2026-05-12T12:41:21+5:302026-05-12T12:41:51+5:30
मंगल वाद्यांच्या निनादात दिंडी सोबत श्री मंडलेश्वर, श्री शिवनाथ व श्री महामाया यांचे पालखीतून माधव देवस्थानात आगमन होईल.

शिरोडा माधव देवस्थानात महाविष्णू अनुष्ठान; पुरुषोत्तम मासानिमित्त सोहळ्याचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क, शिरोडा: सातोरे शिरोडा येथील पुरुषोत्तम मासानिमित्त माधव देवस्थानात दि. १७ ते २० मेपर्यंत महाविष्णू अनुष्ठान श्री शिवनाथ संस्थान व सातोरे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. यानिमित्त शनिवार, दि. १६ संध्याकाळी ५ वाजता मंगल वाद्यांच्या निनादात दिंडी सोबत श्री मंडलेश्वर, श्री शिवनाथ व श्री महामाया यांचे पालखीतून माधव देवस्थानात आगमन होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद होईल.
रविवार, दि. १७रोजी सकाळी ८ वाजता माधव षोडशोपचार पूजा, प्रायश्चित, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, प्राकारशुद्धी, तंतुक बंधन, दुपारी १ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद होईल. संध्याकाळी ५ वाजता भजन होईल.
रात्री ८ वाजता आरती व तीर्थप्रसाद होणार आहे. दरम्यान, महाविष्णू अनुष्ठानाचे पुढील ३ मुख्य दिवस असल्याने दि. १८ रोजी सकाळी ८ वाजता संकल्प, न्यास, श्री माधव षोडशोपचार पूजा, पतमान सूक्त अभिषेक द्वारा जप, महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती, तीर्थप्रसाद व नंतर १:३० वा. महाप्रसाद. संध्या. ५ वा. भजन, नंतर रात्री ८ वा. महाआरती व तीर्थप्रसादनंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
दि. १९ रोजी सकाळी ८ वाजता संकल्प, न्यास, श्री माधव षोडशोपचार पूजा, अभिषेकद्वारा पवमानसूक्त जप, महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, नंतर १:३० वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७वाजता कु. शिवानी सुहास वझे यांचे कीर्तन होईल. रात्री ९ वा. मंगल वाद्यांच्या निनादात दिंडी सोबत पालखी मिरवणूक, नंतर आरती व तीर्थप्रसाद.
दि २० रोजी सकाळी ८ वाजता संकल्प, न्यास, माधव षोडशोपचार पूजा, अभिषेक द्वारा पवमान सूक्त जप, प्रधान देवता स्थापना, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना, लघुविष्णू हवन, पूर्णाहुती, माधव महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती, गाऱ्हाणे, तीर्थप्रसाद व नंतर १:३० वाजता महाप्रसाद होईल.