पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:54 IST2026-05-12T12:46:18+5:302026-05-12T12:54:13+5:30
इराणची लष्करी विमाने पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर लपवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
जगासमोर शांततेचा आव आणणारा पाकिस्तान पडद्यामागे नेमकं काय करतोय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या भूमिकेबाबत एका खळबळजनक अहवालाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इराणच्या लष्करी विमानांना अमेरिकन हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी पाकिस्तानने आपल्या एअरबेसवर आश्रय दिल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान एकीकडे मध्यस्थीचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे ही गुप्त मदत केल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
'सीबीएस न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, युद्धविराम लागू झाल्यानंतर काही दिवसांतच इराणने आपली अनेक महत्त्वाची लष्करी विमाने पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर पाठवली होती. रावळपिंडीजवळ असलेला हा तळ पाकिस्तानचा अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ मानला जातो. या विमानांमध्ये इराणच्या हवाई दलाचे RC-130 हे विमानही सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, जे प्रामुख्याने गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आणि पाळत ठेवण्यासाठी वापरले जाते.
अफगाणिस्तानातही विमानांची लपवाछपवी?
केवळ पाकिस्तानच नाही, तर इराणने आपली काही नागरी विमाने अफगाणिस्तानातही पाठवल्याचे अहवालात म्हटले आहे. काबुलमध्ये 'महान एअर'चे एक इराणी विमान युद्ध सुरू होण्यापूर्वीच पोहोचले होते आणि एअरस्पेस बंद झाल्यानंतर ते तिथेच उभे होते. मात्र, तालिबान सरकारने आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या मते, नूर खान एअरबेस शहराच्या मध्यभागी असल्याने तिथे विमाने लपवणे अशक्य आहे.
अमेरिकन सिनेटर्सचा संताप
या अहवालामुळे अमेरिकेत तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिकन सीनेटर लिंडसे ग्राहम यांनी यावर कडक शब्दांत टीका केली आहे. "जर हा अहवाल खरा असेल, तर अमेरिकेला पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर पुन्हा विचार करावा लागेल," असे ग्राहम यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत, या बातमीने आपल्याला फारसे आश्चर्य वाटले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाकिस्तान सध्या विचित्र परिस्थितीत आहे. एकीकडे अमेरिकेसमोर स्वतःला 'शांततादूत' म्हणून सादर करायचे आहे, तर दुसरीकडे इराण आणि चीनसारख्या शेजारील देशांना नाराज करायचे नाही. ८ एप्रिलपासून इराण आणि अमेरिकेत सीजफायर लागू असले तरी तणाव कायम आहे. पाकिस्तानने गेल्या महिन्यात दोन्ही देशांत चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश आले नाही. आता या नव्या खुलाशामुळे पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.