'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:29 IST2026-05-12T13:27:55+5:302026-05-12T13:29:13+5:30
Google Translateला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात 'I Love You' ला मागे टाकत 'हा' शब्द सर्वाधिक सर्च झाला आहे.

'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
टेक्नोलॉजीच्या जगात गेल्या दोन दशकांपासून भाषिक अडथळे दूर करणाऱ्या 'Google Translate'ला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने गुगलने एक अतिशय रंजक माहिती शेअर केली आहे. जगभरातील युजर्सनी गुगल ट्रान्सलेटवर सर्वाधिक वेळा कोणता शब्द सर्च केला असेल, असा प्रश्न विचारला तर अनेकांना वाटेल की तो 'I Love You' असेल. मात्र, गुगलने दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाच्या या शब्दाला मागे टाकत एका दुसऱ्याच शब्दाने बाजी मारली आहे.
कृतज्ञतेचा शब्द ठरला नंबर वन!
गुगल इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माहिती दिली की, गेल्या २० वर्षांत जगभरात सर्वाधिक ट्रान्सलेट झालेला शब्द 'Thank You' अर्थात 'धन्यवाद' हा आहे. दुसऱ्या क्रमांकावर 'I Love You' हा शब्द आहे. इंटरनेटच्या या जगात आजही लोक एकमेकांचे आभार मानण्याला सर्वाधिक पसंती देतात, हे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गुगलने हा आनंद साजरा करण्यासाठी 'Thank You' हा शब्द विविध भाषांमध्ये लिहून एक खास व्हिज्युअलही शेअर केले आहे.
Over 20 years, the most translated phrase on Google Translate wasn’t complicated at all.
— Google India (@GoogleIndia) May 9, 2026
It was simply: 'thank you.' 💙
Celebrating 20 years of Google Translate ✨ pic.twitter.com/VMTMXGpZot
२००६ पासून सुरू झाला प्रवास
गुगल ट्रान्सलेटची सुरुवात २००६ मध्ये झाली होती. सुरुवातीला हे टूल अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे होते, जिथे फक्त शब्दांचे अर्थ मिळत असत. मात्र, आता हे प्लॅटफॉर्म एआयमुळे इतके प्रगत झाले आहे की, ते केवळ शब्दांचा अर्थच नाही, तर वाक्यांची रचना, संदर्भ आणि बोलण्याचा लहेजा देखील अचूकपणे समजून घेते. आज गुगल ट्रान्सलेट शेकडो भाषांना सपोर्ट करते.
आता उच्चारही सुधारणार!
आपल्या २० व्या वाढदिवसानिमित्त गुगलने ट्रान्सलेटमध्ये एक नवीन धमाकेदार फीचर आणले आहे. ते म्हणजे 'एआय-पावर्ड प्रोनन्सिएशन प्रॅक्टिस'. आता तुम्ही केवळ शब्दांचे भाषांतरच पाहू शकणार नाही, तर ते बोलायचे कसे, याचा सरावही करू शकाल. यासाठी गुगलने 'Pronounce' बटन दिले आहे. जेव्हा तुम्ही एखादा शब्द बोलता, तेव्हा हे अॅप तुमचे विश्लेषण करून सांगेल की तुमचे उच्चार किती अचूक आहेत.