पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:32 IST2026-05-12T13:25:50+5:302026-05-12T13:32:47+5:30
पुण्यातील खडकी पिंपळगावची रहिवासी असलेली स्वप्नाली गेल्या ४ महिन्यांपासून ती वरळीच्या महालक्ष्मी सोसायटीत दोन मैत्रिणींसोबत भाड्याने राहण्यास होती.

पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
मुंबई : नवी मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीत शिक्षण घेणाऱ्या पुण्याच्या २४ वर्षीय कॉलेज तरुणीने वडिलांना व्हिडीओ कॉल करत आत्महत्या केली. स्वप्नाली घेवारी असे मृत तरुणीचे नाव आहे. दारूच्या नशेत वडिलांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी वडील सुनील घेवारी (५६) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मूळची पुण्यातील खडकी पिंपळगावची रहिवासी असलेली स्वप्नाली गेल्या ४ महिन्यांपासून ती वरळीच्या महालक्ष्मी सोसायटीत दोन मैत्रिणींसोबत भाड्याने राहण्यास होती. घेवारी हे शेतकरी असून, त्यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घरामध्ये नेहमी भांडण व्हायचे.
नेहमीच्या कटकटीला वैतागून २६ एप्रिल रोजी स्वप्नालीची आई स्वाती या वरळी येथे राहण्यास आल्या. दोन दिवसांनी त्या बहिणीकडे गेल्या. दरम्यान, १ मे रोजी सुनील हे स्वप्नालीला सतत कॉल करून स्वातीबाबत विचारणा करू लागले. स्वप्नालीने आईला फोन करून त्याबाबत माहिती दिली असता त्यांनी मोबाइल बंद करण्याचा सल्ला तिला दिला.
मुलीच्या मृत्यूनंतर वाजवल्या टाळ्या
घटनेनंतर स्वप्नालीच्या वडिलांनी पत्नीच्या माहेरी धाव घेतली. तिथे स्वप्नालीने व्हिडीओ करून आत्महत्या केल्याचे सांगून टाळ्या वाजवल्या. आता स्वप्नालीप्रमाणे आईचा काटा काढणार असल्याचे बोलल्याचे सुबोधकडून समजताच त्यांना धक्का बसला.
रात्री ८ च्या सुमारास स्वप्नालीने आईला कॉल करून सांगितले की, माझी आता परीक्षा असल्याने मला कॉल करू नका, पप्पांना फोन करून त्यांच्याशी खूप भांडल्याचेही सांगितले. तर ९ च्या सुमारास स्वप्नालीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती स्वाती यांना त्यांचा भाऊ सुबोध चिखले याने दिली.