लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी, महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. कर्मचारी निवड आयोगामार्फत २,५०० पदांची भरती पारदर्शक पद्धतीने होणार असून लवकरच या पदांसाठी आयोग परीक्षा घेणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. वेर्णा येथे रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.
मनुष्यबळ विकास महामंडळाने वेर्णा उद्योग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यात ६ हजारांहून अधिक युवक-युवतींनी नोंदणी करून सहभाग घेतला. २५ कंपन्यांमध्ये ७४० जागांवर भरतीची प्रक्रिया सुरू झाली. व्यासपीठावर उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, जीआयडीसीचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मनुष्यबळ विकास महामंडळाचे अध्यक्ष, आमदार रुडॉल्फ फर्नाडिस, आमदार आंतोन वास, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, मनुष्यबळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, वेर्णा उद्योग संघटनेचे अध्यक्ष कल्पक अरवारे आदी उपस्थित होते.
निवडलेल्या सर्वांना १ मेपूर्वी नियुक्तिपत्रे मिळतील. २ मे पासून कामावर रुजू होता येईल, असे सावंत यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'भरती प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा गैरप्रकार होऊ नयेत यासाठी संपूर्ण प्रणाली अधिक सक्षम आणि पारदर्शक केली आहे व यामुळे उमेदवारांचा विश्वासही वाढला आहे. रोजगाराला चालना देण्यासाठी ईडीसीमार्फत ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, व्यवसाय अपयशी ठरल्यास संबंधित लाभार्थ्याने दोन वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केल्यास व्याज माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांचा आर्थिक धोका कमी होणार आहे.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकारने 'करियर जागोर' कार्यक्रम सुरू करून शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून नेमले आहे. युवकांनी गोवा लोकसेवा आयोग, यूपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षांना बसण्याचीही तयारी ठेवावी. 'महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गुरुदास देसाई यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर कल्पक अरवारे यांनी आभार मानले.
स्टार्टअपना १० लाखांचे अनुदान
मुख्यमंत्र्यांनी युवा वर्गाला उद्योगांकडे कनेक्ट व्हा, असे आवाहन केले. ते म्हणाले ००० की, 'आयटी क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या निर्णयामुळे राज्यात स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळेल.'
'कोणतेही काम कमी दर्जाचे नाही'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'कोणतेही काम कमी दर्जाचे लेखू नका. मी शिरोड्याच्या आयुर्वेदिक इस्पितळात महिना चार हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावर निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून सुरवातीला नोकरी केली, असा अनुभव त्यांनी सांगितला.
तीन शिफ्टमध्ये बससेवा
औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या कामगारांची वाहतुकीची सोय व्हावी यासाठी पहिल्या टप्प्यात वेर्णा औद्योगिक वसाहतींतून तिन्ही शिफ्ट्समध्ये पणजी, फोंडा व इतर प्रमुख बसस्थानकांना जोडणारी बससेवा सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
... तर पुन्हा कंपन्यांना बोलावणार
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सहा हजार जणांनी नोंदणी केली तरी दिवसभरात १५०० जणांच्या मुलाखती पूर्ण होऊ शकतात. उर्वरित उमेदवारांनी 'बायोडेटा' देऊन जावे. दहा दिवसांत पुन्हा या कंपन्यांना बोलावू, रोजगार मेळाव्याची जाहिरात सकाळी केल्यानंतर दुपारपर्यंत ३,००० जणांनी नोंदणी केली. यावरून गोव्यातील तरुण, तरुणी काम करण्यास इच्छुक आहेत, हे दिसते. उमेदवारांना प्रशिक्षणाची सोयदेखील करता येईल.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant announced 2,500 jobs through the Selection Board to alleviate unemployment. A job fair saw 6,000 registrations, with 740 positions being filled. Subsidized loans and career guidance are also offered to boost employment and entrepreneurship in Goa.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने बेरोजगारी कम करने के लिए चयन बोर्ड के माध्यम से 2,500 नौकरियों की घोषणा की। एक रोजगार मेले में 6,000 पंजीकरण हुए, जिनमें से 740 पद भरे जा रहे हैं। गोवा में रोजगार और उद्यमिता को बढ़ावा देने के लिए सब्सिडी वाले ऋण और करियर मार्गदर्शन भी दिया जा रहा है।