माओवाद्यांचे एक कोटीचे घबाड जवानांच्या हाती; जंगलात पुरुन ठेवली होती रोकड
By संजय तिपाले | Updated: May 12, 2026 20:38 IST2026-05-12T20:37:26+5:302026-05-12T20:38:00+5:30
Gadchiroli : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील अबूझमाडमधील नारायणपूर जिल्ह्याच्या घनदाट जंगलात माओवाद्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेले घबाड १२ मे रोजी जवानांच्या हाती लागले.

Maoists' loot of Rs 1 crore in hands of jawans; cash buried in forest
गडचिरोली : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील अबूझमाडमधील नारायणपूर जिल्ह्याच्या घनदाट जंगलात माओवाद्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेले घबाड १२ मे रोजी जवानांच्या हाती लागले. यावेळी १ कोटी १ लाख ६४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि एके-४७ सह आधुनिक शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे माओवाद्यांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले आहे.
नारायणपूरच्या अतिसंवेदनशील जंगलात गेल्या एक महिन्यापासून सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. यादरम्यान, गावकरी आणि गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नारायणपूर पोलिस, डीआरजी , एसटीएफ , आयटीबीपी आणि बीएसएफच्या संयुक्त पथकाने जंगलातील माओवादी डंपवर छापा टाकला. नक्षलवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेले १ कोटींहून अधिक रोख रुपये पोलिसांच्या हाती लागले. दरम्यान, माओवादांच्या गडात शिरुन सुरक्षा दलाने ही मोहीम फत्ते केली. त्यामुळे माओवाद्यांकरता हा मोठा हादरा मानला जात आहे.
घातपाताचा कट उधळला
जप्त केलेली ही कोट्यवधींची रक्कम माओवाद्यांनी लेव्ही आणि अवैध वसुलीच्या माध्यमातून जमा केली होती, असा अंदाज आहे. या पैशांचा वापर मोठ्या हिंसक घटना घडवण्यासाठी आणि नवीन भरतीसाठी केला जाणार होता, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच ही रक्कम जप्त करून त्यांचा मोठा कट उधळवून लावला आहे.
मोठा शस्त्रसाठा हस्तगत
घटनास्थळाहून ३ एके-४७ रायफल्स, ३ एसएलआर रायफल्स ,१३२ बीजीएल सेल्स, ३०३ व३१५ बोर रायफल्स, १२ बोर बंदुका व देशी कट्टे, मोठ्या प्रमाणात काडतुसे, इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स आणि कॉर्डेक्स वायर वॉकी-टॉकी आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
माओवादविरोधी अभियान तीव्र
या कारवाईनंतर या परिसरात माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले असून, नागरिकांनी जंगलात काहीही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नारायणपूरचे पोलिस अधीक्षक रोबिनसन गुडिया यांनी केले आहे.