माओवादी नेता 'मिसिर बेसरा'ची कोंडी, १५ कमांडर्सची लवकरच शरणागती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:47 IST2026-05-15T14:44:26+5:302026-05-15T14:47:16+5:30
Gadchiroli : झारखंडमधील सारंडा आणि कोल्हानच्या दुर्गम जंगलांत सुरक्षा दलांनी केलेल्या कडेकोट घेराबंदीमुळे पाच कोटींचे बक्षीस असलेला जहाल माओवादी नेता मिसिर बेसरा अडचणीत सापडला आहे.

Maoist leader 'Misir Besra' in trouble, 15 commanders to surrender soon
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : झारखंडमधील सारंडा आणि कोल्हानच्या दुर्गम जंगलांत सुरक्षा दलांनी केलेल्या कडेकोट घेराबंदीमुळे पाच कोटींचे बक्षीस असलेला जहाल माओवादी नेता मिसिर बेसरा अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या संघटनेतील १५ प्रमुख कमांडर आता शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात येण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सुरक्षा दलांनी सारंडाच्या 'मंकी फॉरेस्ट' परिसरात सातत्याने राबविलेल्या मोहिमांमुळे माओवाद्यांचे मनोबल पूर्णपणे खचले आहे. सध्या नक्षल संघटनेत गणपती आणि मिसीर बेसरा हे दोनच सर्वोच्च नेते उरले आहेत.
मात्र, गणपती दीर्घकाळापासून आजारपणामुळे भूमिगत आहे, तर बेसरा आपल्या तुकडीसह झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये धावपळ करत आहे. त्याच्या ५३ सदस्यांच्या तुकडीपैकी १५ जणांनी पोलिसांशी संपर्क साधला असून, यात १० लाखांचे बक्षीस असलेला झोनल कमांडर अश्विन, चंदन लोहरा, सोहन पुनेई व महिला कमांडर अनिशा, सपना यांचा समावेश आहे. झारखंडमधील या मोठ्या घडामोडींचे पडसाद आता महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती नक्षलग्रस्त भागांवरही उमटण्याची शक्यता आहे. रस्ते, विकासकामे आणि प्रशासनाचा वाढता संपर्क यांमुळे माओवाद्यांची पकड सैल झाली आहे.
बेसराच्या परवानगीनेच पात्राचे समर्पण?
एकीकडे अटकेचे सत्र सुरू असतानाच, जहाल नक्षलवादी माधई पात्रा याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. धक्कादायक माहिती अशी की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त असलेल्या पात्राने थेट मिसिर बेसराची परवानगी घेऊनच हा मार्ग निवडल्याचे समजते. यामुळे संघटना खिळखिळी झाली आहे.
काशीपूर परिसरातून आवळल्या मुसक्या
कोलकाता पोलिसांनी १३ रोजी एक मोठी मोहीम फत्ते करत मिसिर बेसराची अत्यंत विश्वासू सहकारी श्रद्धा विश्वास ऊर्फ बेला हिला उत्तर काशीपूर परिसरातून अटक केली. बेलावर झारखंडमध्ये २३ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, ती विविध राज्यांतील नक्षली कारवायांमध्ये समन्वयक म्हणून काम पाहत होती. तिच्या अटकेमुळे नक्षलवाद्यांचे आंतरराज्य जाळे विस्कळीत झाले आहे.