आरोग्यसेवेचे धिंडवडे ! दवाखान्यात वीज नाही, इनव्हर्टरही नाही; चिमुकल्या बाळाचा व्हेंटिलेटर बंद पडल्याने तडफडून गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 20:05 IST2026-05-13T20:03:34+5:302026-05-13T20:05:38+5:30
Gadchiroli : येथील महिला व बाल रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बाळाला रुग्णवाहिकेसाठी दीड तास ताटकळावे लागले होते. त्यानंतर त्यास नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) भरती करून उपचार करण्यात आले.

Healthcare chaos! There is no electricity, no inverter in the hospital; A small child's life was shattered when the ventilator stopped working.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील महिला व बाल रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बाळाला रुग्णवाहिकेसाठी दीड तास ताटकळावे लागले होते. त्यानंतर त्यास नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) भरती करून उपचार करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी अचानक वीज गेली आणि इन्व्हर्टरमध्येही बिघाड झाला, परिणामी व्हेंटिलेटरने साथ सोडली अन् चिमुकल्या जिवाचा करुण अंत झाला. पित्याने केलेल्या गंभीर आरोपामुळे आरोग्यसुविधांचे धिंडवडे निघाले असून, यंत्रणेच्या विदारक वास्तवाचा प्रत्यय आला आहे.
संजना संदीप कुमरे (२३, रा. गेवर्धा ता. कुरखेडा) यांना प्रसव वेदना सुरू झाल्याने ११ मे रोजी कुरखेड्यावरून गडचिरोलीत हलवण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. ट्रकचालक असलेल्या पित्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आईने बाळाला पहिल्यांदा कुशीत घेतले, मायेची ऊब दिली. पण हा आनंद क्षणभंगुर ठरला. सायंकाळी ७:३० च्या सुमारास बाळाची प्रकृती अचानक खालावली.
बाळ पाय का हलवत नाही?, आईचा काळीज पिळवटणारा प्रश्न
आई मुदतपूर्व प्रसूती कक्षात तर बाळ नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. १२ मे रोजी दुपारी डॉक्टरांनी वडिलांना बाळ दगावल्याचे सांगितले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एवढ्यात तेथे आई बाळाला पाहण्यासाठी आली. तिने बाळ पाय का हलवित नाही, असे विचारले आणि बापाचा कंठ दाटून आला. त्यानंतर आईने आक्रोश केला. संजना यांची ही पहिलीच प्रसूती होती. घरी बाळ येणार म्हणून कुटुंबीय आनंदी होते. मात्र आनंदाचे क्षण दुःखात बदलले.
डॉक्टर म्हणाले, व्यवस्थापनाला विचारा
डॉक्टरांनी बाळाला तातडीने चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, दीड तास उलटूनही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. '१०८' वर कॉल केल्यावर दोन तास लागतील असे उत्तर मिळाले. त्यानंतर बाळाला नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल केले. मंगळवारी दुपारी बाळ गेल्याची बातमी डॉक्टरांनी सांगितली, तेव्हा वडील संदीप कुमरे यांनी डॉ. विकेश भाजीभुजे यांना इन्व्हर्टरची व्यवस्था का नाही, असा सवाल केला. त्यावर डॉ. भाजीभुजे यांनी मला काही सांगू नका, व्यवस्थापनालाच विचारा, असे उत्तर दिल्याचा आरोप संदीप कुमरे यांनी केला आहे.
बाळाच्या वडिलांचे नेमके आरोप काय ?
बाळाच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, रुग्णालयातील वीज तब्बल दीड तास गुल होती. दरम्यान, बॅकअप देणारे इन्व्हर्टरही निकामी झाले. यामुळे व्हेंटिलेटर बंद पडले आणि ऑक्सिजनच्या अभावी त्या कोवळ्या जिवाचा श्वास कोंडला गेला.
हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करा, आपची मागणी
- नवजात बाळ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याची शिफारस करून डॉक्टर निघून गेले, दीड तास बाळाला रुग्णवाहिका मिळाली नाही. नंतर नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले.
- येथेच उपचार शक्य होते, तर आधी रेफरचा सल्ला कसा काय दिला, नातेवाईकांचे आरोप गंभीर आहेत, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे. हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपचे जिल्हाध्यक्ष नासेर हाश्मी यांनी दिला.
"मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते. त्याची प्रकृती जन्मतःच नाजूक होती. उपचारात हलगर्जी झालेली नाही. डॉक्टरांनी बाळाच्या वडिलांना अशा पद्धतीने उत्तर दिले असेल, तर चौकशी केली जाईल."
- डॉ. प्रशांत पेंदाम, प्रभारी अधीक्षक महिला व बाल रुग्णालय