'तू चिडचिड नको करुस' पुतण्याला सल्ला देणे पडले महागात; झोपेत असताना काकाला केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:07 IST2026-05-07T13:06:33+5:302026-05-07T13:07:17+5:30

Gadchiroli : 'तू शांत राहा. तुझी चिडचिडच तुझ्या त्रासाला कारण आहे', अशी समज काकाने आपल्या पुतण्याला दिली. मात्र, हाच सल्ला पुतण्याच्या जिव्हारी लागला आणि त्याने चक्क आपल्या ६५ वर्षीय काकाचा झोपेत असताना कुन्हाडीने गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना

'Don't get angry' advice to nephew cost him dearly; Uncle killed while he was sleeping | 'तू चिडचिड नको करुस' पुतण्याला सल्ला देणे पडले महागात; झोपेत असताना काकाला केले ठार

'Don't get angry' advice to nephew cost him dearly; Uncle killed while he was sleeping

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची (गडचिरोली) :
'तू शांत राहा. तुझी चिडचिडच तुझ्या त्रासाला कारण आहे', अशी समज काकाने आपल्या पुतण्याला दिली. मात्र, हाच सल्ला पुतण्याच्या जिव्हारी लागला आणि त्याने चक्क आपल्या ६५ वर्षीय काकाचा झोपेत असताना कुन्हाडीने गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना मुलेटीपदीकसा गावात ६ मे रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरची पोलिसांनी आरोपी पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुनाराम बैसाकू धुर्वे (वय ६५) असे मयताचे नाव आहे. आरोपी रामनाथ श्यामराव धुर्वे (वय २०) हा त्यांचा पुतण्या आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी रामनाथने काका पुनाराम यांना 'माझे डोके खूप दुखते. मला एखादा चांगला वैद्य सांगा', असे विचारले होते. त्यावर काकांनी त्याला शांत राहण्याचा आणि स्वभावातील चिडचिड कमी करण्याचा सल्ला दिला होता. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. तेव्हापासून आरोपी रामनाथ काकांचा राग मनात धरून होता.

शेतातील झोपडीत गाठले अन्...

५ मे रोजी रात्री पुनाराम हे नेहमीप्रमाणे गावाजवळील शेतातील झोपडीत झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीदरम्यान रामनाथ तिथे दबा धरून बसला होता. काका गाढ झोपेत असल्याची खात्री पटताच रामनाथने धारदार कुन्हाडीने त्यांच्या मानेवर जोरदार वार केले. घाव इतका खोल होता की, पुनाराम यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. हत्येनंतर रक्ताने माखलेली कुन्हाड तिथेच फेकून आरोपीने पोबारा केला.

अवघ्या काही तासांत आरोपी अटकेत

घटनेची माहिती मिळताच कोरची ठाण्याचे पो. नि. शैलेंद्र ठाकरे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संशयाची सुई रामनाथकडे वळताच सहायक निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक योगेश पवार यांच्या पथकाने त्याचा शोध घेतला.
दुपारी त्याला घरातूनच अटक केली. त्यास ७ रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पो.नि. ठाकरे यांनी दिली.

बंगळुरूहून आला होता गावी

आरोपी रामनाथ हा रोजगारासाठी बंगळुरूला गेला होता. चार महिन्यांपूर्वीच तो गावी आला होता. पुन्हा तो परत गेलाच नाही. यानंतर त्याचा काकांशी वाद झाला. सुडाने पेटलेला रामनाथ काका पुनाराम यांना संपवूनच शांत झाला.

Web Title: 'Don't get angry' advice to nephew cost him dearly; Uncle killed while he was sleeping