पऱ्हे करपताहेत; शेतकरी मेटाकुटीस

By Admin | Updated: July 16, 2015 02:09 IST2015-07-16T02:09:22+5:302015-07-16T02:09:22+5:30

यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली.

Doing so; Farmers metakutis | पऱ्हे करपताहेत; शेतकरी मेटाकुटीस

पऱ्हे करपताहेत; शेतकरी मेटाकुटीस

गडचिरोली : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली. मात्र पेरणीनंतर १५ ते २० दिवस पावसाने दडी मारली. त्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात दोन दिवस हलकासा पाऊस बरसला. आता निसर्गाने डोळे वटारले असून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकलेले धानाचे पऱ्हे करपत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात सिंचन सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या साहाय्याने कसेबसे पऱ्हे वाचविले. मात्र पाण्याचे स्त्रोतही कोरडे झाल्याचे रोवणीलायक पऱ्हे होऊनही दमदार पावसाअभावी जिल्हाभरातील रोवणीचे काम खोळंबले आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
धान बियाणे उगवलेच नाही : आरमोरी शहरालगतच्या शेतात काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. तसेच काही शेतकऱ्यांनी धान पिकाच्या आवत्याची पेरणी केली. मात्र पावसाने दोन आठवड्यापासून उसंत घेतल्यामुळे या भागातील शेतजमिनीतून धान बियाण्यांचे अंकूर अत्यल्प प्रमाणात उगवले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्हे व आवत्या पावसाअभावी उगवलेच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर पऱ्हे व आवत्याची दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
देसाईगंज तालुक्यातील विसोरा भागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धानाची पेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी धानाच्या पऱ्ह्याची वाढ खुंटली असल्याने विहित वेळेत रोवणीचे काम होणार नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
१५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी तसेच रोवणीसाठी देसाईगंज तालुक्यातील विसोरा भागातील शेतकरी मोटारपंपाच्या सहाय्याने शेतीला पाणी पुरवठा करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून वीज पुरवठ्याचे अघोषित भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोटारपंपही निकामी झाले आहेत. मोटारपंप असूनही शेतकरी ऐनवेळी पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.

Web Title: Doing so; Farmers metakutis