विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 10, 2026 07:25 IST2026-05-10T07:24:03+5:302026-05-10T07:25:50+5:30

जे स्वतःला विरोधी पक्षाचे म्हणवून घेतात ते सरकारच्या विरोधात नेमके काय करतात ते समजत नाही. थोडक्यात काय तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष शोधण्याची जाहिरात देण्याची वेळ आली आहे.

Special Article: Should a reward of one lakh be given if the opposition party is seen? | विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?

विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?

-अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)

प्रिय सुधीरभाऊ,
नमस्कार.
महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेते नाहीत. जे सत्तेच्या बाहेर आहेत ते विरोधात आहेत असे दिसत नाही. जे स्वतःला विरोधी पक्षाचे म्हणवून घेतात ते सरकारच्या विरोधात नेमके काय करतात ते समजत नाही. थोडक्यात काय तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष शोधण्याची जाहिरात देण्याची वेळ आली आहे. पूर्वी घरातून एखादा मुलगा रागारागाने निघून गेला तर कशी जाहिरात येत असे... 'तुला कोणी रागवणार नाही... तुला कोणी बोलणार नाही... तू लवकर घरी परत ये.. तुला नवीन शर्ट घेऊन देतो... तुझ्या आवडीचे पदार्थ खायला देतो... पण तू लवकर ये...' अशी ती जाहिरात असायची. महाराष्ट्रात विरोधी पक्षासाठी अशीच जाहिरात देण्याची वेळ आली आहे, असे आपण प्रचंड नाराजीने काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना सांगत होतात, अशी माहिती परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते. कोणी, कोणाला काय सांगितले? यापेक्षाही विरोधी पक्ष आहे की नाही? हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे.

काँग्रेसच्या खा. वर्षा गायकवाड धारावी पलीकडे बोलत नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आरएसएसने तिरंगा कसा फडकवला नाही... असे म्हणत मुख्यमंत्री आणि सरकारवर शाब्दिक बाण मारण्यापलीकडे बोलत नाहीत. एकीकडे सरकारला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि दुसरीकडे सरकारने नेमका काय भ्रष्टाचार केला? याचा एकही पुरावा द्यायचा नाही, अशी त्यांची नीती आहे की रणनीती कळत नाही... नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसचेच नेते भाजपच्या 'टीम बी'चे सदस्य म्हणतात. आपल्याच पक्षाचे लोक, आपल्याबद्दल असे बोलत असतील तर आपण तरी सरकारच्या विरोधात का बोलावे? असे त्यांना वाटले तर त्यात गैर काही नसावे, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला वाटते.

त्यांच्या राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे थोडेसे सरकार विरोधी बोलताना दिसतात. मात्र त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ही मंडळी नेमकी गेली कुठे? त्यांच्यासाठी ही तशीच जाहिरात द्यायची का..? जय पवार यांनी सुनेत्रा वहिनी २०२९ मध्ये मुख्यमंत्री होताना पाहायचे आहे, असे सांगितले. परिणामी त्यांच्या राष्ट्रवादीत त्यांच्याच विरोधात बोलणाऱ्यांची संख्या वाढू शकते. या दोन्ही घटनेचा अभ्यास करण्याची जबाबदारी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोणाकडे तरी देण्याचा विचार सुरू केल्याचे समजते.

उद्धवसेनेतून विरोधी पक्षनेतेपदाची आस लावून बसलेल्या भास्कर जाधव यांना, ते पद मिळेपर्यंत कशाला सरकारच्या विरोधात बोलायचे असा प्रश्न पडलेला दिसतो. आपण सरकारच्या विरोधात काही बोललो तर मुख्यमंत्री नाराज होतील. त्यापेक्षा विरोधी पक्षनेते पद मिळेपर्यंत गप्प बसलेले बरे, अशी भास्कर जाधव यांची भूमिका असल्याचे शिवसेनेच्याच काही नेत्यांना वाटते. पण ही बाब ते खासगीत बोलतात. स्पष्टपणे बोलायची त्यांची इच्छा दिसत नाही. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते होते. त्यांना पुन्हा आमदारकी मिळाली. मात्र विरोधी पक्षनेतेपद मिळेल की नाही माहिती नसल्यामुळे ते देखील फारसे विरोधात बोलताना दिसत नाहीत. मनसेचे आमदारच नसल्यामुळे त्यांना असे कुठले पद मिळवण्याची इच्छा नाही. अधून मधून सत्ताधारी पक्षाचे मंत्री त्यांच्या निवासस्थानी येतात. चहापान करतात, निघून जातात. त्यामुळे तिकडूनही विरोधाचे वारे फारसे वाहताना दिसत नाहीत.

राहिला प्रश्न शिंदेसेनेचा आणि भाजपचा. ते दोन्ही पक्ष मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये एकमेकांचे विरोधक असल्यासारखे वागतात, बोलतात. 

शिंदेसेनेतील काही नाराज मंडळी आम्ही जायचे तरी कुठे? अशा विचारात अस्वस्थपणे कधी कधी 'नंदनवन' वर जाऊन स्वतःच्याच पक्षातील नेत्यांबद्दलच्या विरोधी भावना व्यक्त करून शांत बसतात. अशी सगळी अवस्था असताना अधिवेशन काळात, सुधीर भाऊ, तुम्हीच एकटे विरोधी पक्ष नेते असल्यासारखे सरकारवर टीका करता. अडचणीचे प्रश्न विचारता. अधिवेशन संपले की तुम्ही देखील मुंबई बाहेर निघून जाता... सुधीर भाऊ, आता सगळी भिस्त तुमच्यावरच आहे. तुम्ही अधिवेशन काळापुरते सरकारच्या विरोधात न बोलता इतर वेळीही सरकार विरोधी बोलत गेलात तर तुमची तुलना तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासोबत होण्याची दाट शक्यता आहे.

पंडित नेहरू पंतप्रधान असताना ते स्वतःच स्वतःच्या सरकारविरुद्ध वर्तमानपत्रांमधून वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहायचे. तेव्हाच्या संपादकांनी तुम्ही असे का करता? असे त्यांना विचारले होते. त्यावर पंडितजी म्हणाले होते, सरकारच्या विरोधाचा सूर स्पष्ट असावा. विरोधी पक्ष असेल तर लोकशाही मजबूत होते... त्यामुळे सुधीर भाऊ, लोकशाही मजबूत करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. त्याशिवाय पंडितजींसोबतची तुलना ही काही सोपी गोष्ट नाही... ज्यांच्याकडे विरोधक म्हणून अपेक्षेने पहावे त्यांची ही अवस्था आहे, म्हणून आता आम्ही आपल्याकडे आशेने पाहत आहोत....
तुमचाच, बाबूराव

Web Title : महाराष्ट्र में विपक्ष नदारद? खोजने पर मिलेगा इनाम!

Web Summary : महाराष्ट्र में विपक्ष कमजोर है, जिससे खोज विज्ञापन की मांग उठ रही है। प्रमुख नेता चुप हैं, आंतरिक संघर्ष जारी हैं, और सत्तारूढ़ दल आपस में झगड़ रहे हैं। केवल सुधीर भाऊ ही कुछ आलोचना करते हैं।

Web Title : Maharashtra Opposition Absent? Reward Offered for Spotting Them!

Web Summary : Maharashtra's opposition is weak, prompting calls for a search advertisement. Key leaders are silent, internal conflicts persist, and the ruling parties bicker amongst themselves. Only Sudhir Bhau offers some criticism.