रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 06:01 IST2026-05-10T05:59:38+5:302026-05-10T06:01:45+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी तीन दिवस युद्ध थांबवण्याला होकार दिला.

रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
वॉशिंग्टन/मॉस्को : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी तीन दिवसांच्या युद्धविरामासाठी संमती दर्शवली आहे. या काळात दोन्ही देशांकडून प्रत्येकी १,००० युद्धकैद्यांची अदलाबदलदेखील केली जाणार आहे. हा युद्धविराम शनिवार (९ मे) ते सोमवार (११ मे) पर्यंत लागू असेल.
९ मे रोजी रशियामध्ये 'विजय दिन' साजरा केला गेला. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन ट्रम्प यांनी दोघांना युद्ध थांबविण्याची विनंती केली. मी विनंती केली आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन तसेच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की दोघेही लगेच तयार झाले. हा काळ शांततेचा असेल, ज्यामुळे निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.
कैद्यांचे हस्तांतरण
या करारानुसार रशिया आणि युक्रेन प्रत्येकी १,००० कैदी एकमेकांना सोपवणार आहेत. झेलेन्स्की यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, रशियातील सोहळ्यापेक्षा आमच्या सैनिकांचे प्राण आणि त्यांची घरवापसी अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची नाकाबंदी तोडणाऱ्या दोन इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई
दुबई/वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नौदलाने शुक्रवारी इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर लष्करी कारवाई केली. इराणची दोन जहाजे इराणच्या बंदरांवर टाकलेली नाकाबंदी तोडण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी या जहाजांच्या धुराड्यांवर अचूक मारा करून त्यांना निकामी केले. या कारवाईत एका खलाशाचा मृत्यू व १० जखमी झाले आहेत.
बहारिनमध्ये ४१ जणांना अटक अमेरिकेच्या
पाचव्या आरमारी ताफ्याचे मुख्यालय असलेल्या बहरिनमध्ये इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड'शी संबंधित असल्याच्या संशयावरून ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. जे इराणला मदत करीत आहेत, त्यांचा तपास सुरू असल्याचे बहरिनच्या गृहखात्याने सांगितले.