"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 08:24 IST2026-05-10T08:17:53+5:302026-05-10T08:24:32+5:30
रशिया युक्रेन यांच्यातील युद्धविराम पाहता लवकरच या दोन्ही देशात सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
मॉस्को - युक्रेन युद्ध आता अखेरच्या टप्प्यात आलं आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंन्स्की मला भेटण्यास तयार आहेत असं स्लोवाकियाचे फिको यांनी सांगितले. आम्ही लवकरच एका त्रयस्थ देशात भेटू शकतो असं रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी सांगितले. रशियात ९ मे रोजी मॉस्को रोडच्या रेड स्क्वॉयरमध्ये विजयी दिवस साजरा करण्यात आला. नाझी जर्मनीवर सोवियत संघाचा विजय आणि दुसऱ्या महायुद्धात मारले गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाआधीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात ३ दिवसांसाठी युद्धविराम झाल्याची घोषणा केली. रशिया आणि युक्रेनही याला पुष्टी दिली. ९ ते ११ मे या काळात सर्व सैन्य कारवाई स्थगित केल्याचे दोन्ही देशांनी सांगितले.
युक्रेनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी तिसऱ्या देशात भेटीसाठी तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय एक अटही ठेवली आहे. ही भेट तेव्हाच शक्य आहे जेव्हा एक कायमचा शांतता करार होईल. सोबतच अमेरिकेचा उल्लेख करत झेलेन्स्की यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या दोन्ही देशात वाटाघाटी पुढे नेण्यात मदत केल्याबद्दल आम्ही अमेरिकेचे आभारी आहोत असं त्यांनी म्हटलं. रशिया युक्रेन यांच्यातील युद्धविराम पाहता लवकरच या दोन्ही देशात सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तर रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी लवकरच अमेरिका-इराण युद्ध संपण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी चीनसोबत एका महत्त्वाच्या कराराचे संकेत दिले आहेत. रशिया आणि चीन यांच्यात गॅस आणि तेल करार होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील ३ दिवसांच्या युद्धविरामाचे श्रेय घेताना अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हा युद्धविराम दीर्घ आणि घातक युद्धाच्या अंताची सुरुवात ठरेल असा विश्वास व्यक्त केला. त्याशिवाय ट्रम्प यांनी केलेली युद्धविरामाची मागणी स्वीकारल्याबद्दल रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे कौतुकही केले आहे. या दोन्ही देशांमध्ये एक-एक हजार युद्धबंद्यांना एकमेकांकडे सुपूर्द करण्यावर सहमती झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.