दुर्जन विचारांनी सज्जनशक्तीचे अपहरण करू नये म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:08 IST2026-04-15T11:07:19+5:302026-04-15T11:08:10+5:30
सज्जन लोकांच्या विचारांचा पराभव करण्याचा हातखंडा राजमार्ग म्हणजे त्यांचे दैवतीकरण करणे. विचारांचा जागर, त्या अनुषंगाने कृती जास्त महत्त्वाची !

दुर्जन विचारांनी सज्जनशक्तीचे अपहरण करू नये म्हणून...
- डॉ. हमीद दाभोलकर
(मानसोपचारतज्ज्ञ, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस)
११ एप्रिल रोजी सुरू झालेले महात्मा जोतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष आणि १४ एप्रिल रोजी झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती आपण नुकतीच साजरी केली. त्यांच्या युगप्रवर्तक विचारांचा जागर करण्याबरोबरच या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे दैवतीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली दिसते.. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चांगुलपणाला ज्यांनी अत्यंत कष्टपूर्वक सज्जनशक्तीमध्ये रूपांतरित केले अशा या दोन महान व्यक्ती ! त्यांना माणूस म्हणून आठवणे, त्यांच्या विचारांचा जागर करणे, त्या अनुषंगाने कृती करणे या गोष्टींना आपण अधिक महत्त्व दिले पाहिजे आणि त्यांचे विचार कृतीत उतरवण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न केले पाहिजे, इतरांना त्याकरता उद्युक्त केले पाहिजे. प्रतिमांची मिरवणूक, जल्लोष यामागची भावना प्रामाणिक असली, तरी त्यापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे.
सज्जन लोकांच्या विचारांचा पराभव करण्याचा एक शतकानुशतके चालत आलेला राजमार्ग म्हणजे त्यांचे दैवतीकरण करणे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये या सज्जनशक्तीचा पराभव करण्यासाठी विरोधकांची फारशी गरज पडत नाही ! याचे कारण एकदा का आपण त्यांचे दैवतीकरण सुरू केले की, त्यांच्यासारखे वागण्याची आपली जबाबदारी झटकून टाकायला आपण मोकळे होतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून अगदी गाडगेबाबांपर्यंत अनेक युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वांनी आपल्या देशाला आकार दिला. त्यांचे स्मरण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या विचारांशी असलेली आपली बांधिलकी कायम आहे ना याचे भान सतत जागते ठेवणे.
दैवतीकरण टाळूनदेखील आपल्या या अत्यंत कर्तृत्ववान पूर्वसुरींची आठवण कशी अखंड राखता येऊ शकेल? - त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. असे मार्ग अनेकांनी शोधले आहेत. प्रागतिक विचारांच्या अनेक व्यक्ती आणि संघटना त्यांच्या पातळीवर हे प्रयत्न करत असतात. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर पुस्तकांचे स्टॉल लावून कोट्यवधी रुपयांची पुस्तक विक्री केली जाते. सत्यशोधकी पद्धतीने विवाह लावून जोतिबा फुले यांची आठवण काढणे किंवा ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोळा-सोळा तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचे त्याप्रमाणे सलग अभ्यास करण्याची स्पर्धा अशा स्वरूपाचे अनेक उपक्रम करता येऊ शकतात.
सोलापूर शहरात डीजेमुक्त आंबेडकर जयंतीचा केलेला उपक्रमदेखील अत्यंत अनुकरणीय म्हणावा असा आहे. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेल्या त्यांच्या शेवटच्या भाषणात व्यक्तिपूजेविषयी अतिशय कठोर इशारा दिला आहे. राजकारणात व्यक्तिपूजा शेवटी हुकूमशाहीकडे घेऊन जाते एवढेच सांगून ते थांबत नाहीत तर ते असेदेखील सांगतात की, ‘कृतज्ञता बाळगण्यात काहीही गैर नाही, पण ती स्वातंत्र्याच्या किमतीवर नसावी’. दैवतीकरणाच्या मार्गे कोणी सज्जनशक्तीचे अपहरण करू नये अशी जर आपली प्रामाणिक इच्छा असेल तर आपण बाबासाहेबांनी दिलेला हा इशारा अजिबात विसरता कामा नये.
hamid.dabholkar@gmail.com