'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा...

By संदीप प्रधान | Published: September 19, 2019 11:13 AM2019-09-19T11:13:58+5:302019-09-19T11:18:07+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: लोकसभा निवडणुकीत मोदींकडे पाहून लोकांनी मते दिली. तो निकाल तसाच्या तसा विधानसभेला रिपीट होत नाही.

Maharashtra Vidhan Sabha Election 2019: the only way with shiv sena to stop bjp from Alliance | 'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा...

'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा...

Next
ठळक मुद्देसत्तेमुळे स्वार्थी बनलेल्या भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील मित्रत्वाचे नाते केव्हाच संपले आहे. स्वबळावर सहज १७० जागा मिळतील, असे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष असल्याचे खासगीत सांगितले जाते. शिवसेनेतील आमदार हे तर युती व्हावी याकरिता सध्या देव पाण्यात घालून बसले आहेत.

>> संदीप प्रधान

भाजप व शिवसेना या दोन तथाकथित मित्रपक्षांची युती होणार का? या प्रश्नाचे हास्यास्पद भजे झाले आहे. रोज नवनवीन फॉर्म्युल्यांच्या पुड्या या दोन्ही पक्षांनी मीडियाची दिशाभूल करण्याकरिता पेरलेले नेते सोडत आहेत. निवडणूक लढवण्यात ज्यांना रस आहे. निवडणूक लढवण्याकरिता ज्यांचे काही कोटी रुपये लागलेले आहेत अशा काही शेकडा किंवा फार तर हजारेक लोकांना हे दोन्ही पक्ष युती करणार का, यामध्ये रस आहे. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यात गेल्या पाच वर्षांत काडीमात्र फरक पडलेला नसल्याने त्यांना लोकलला लटकून आणि खड्ड्यांच्या रस्त्यांवरुन जीव मुठीत धरून जीवनक्रम रेटायचा असल्याने युतीचा पोपट मेला किंवा त्यामध्ये धुगधुगी आली तरी त्यांना काही देणेघेणे नाही.

सत्तेमुळे स्वार्थी बनलेल्या भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील मित्रत्वाचे नाते केव्हाच संपले आहे. यांचे हिंदुत्व मूळातच बेगडी असल्याने त्याचे फेविकॉल या दोघांना एकत्र बांधून ठेवेल, अशी परिस्थिती नाही. नरेंद्र मोदी यांनी केंद्रात पुन्हा बहुमताची सत्ता दिल्याने भाजपचे नेते हवेत आहेत. त्यांची तशी अवस्था होणे स्वाभाविक आहे. ज्या महाराष्ट्रात आतापर्यंत ते चौथ्या क्रमांकावर होते तेथे ते पहिल्या क्रमांकावर आल्याने त्यांची मान ताठ न होणे हेच आश्चर्य ठरले असते. त्यामुळे महाराष्ट्रात एकदा स्वबळाची सत्ता उपभोगण्याची तीव्र इच्छा भाजपच्या कार्यकर्त्यांना झाली आहे. प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्या काळात दिलेला स्वबळाचा नारा आज इतक्या वर्षांनी प्रत्यक्षात येत असल्याने छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. स्वबळावर सहज १७० जागा मिळतील, असे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष असल्याचे खासगीत सांगितले जाते. भाजप स्वबळावर सर्व जागा लढला तरच संपूर्ण बहुमत शक्य आहे. मात्र जर भाजपने शिवसेनेला १२० किंवा त्यापेक्षा जास्त जागा सोडल्या व मित्रपक्षांना १८ ते २० जागा दिल्या तर १५५ ते १६० जागा लढवून संपूर्ण बहुमत कसे येणार? म्हणजे संधी असतानाही मित्रप्रेमापोटी त्याग केला तर आपले कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज होणार, ते कदाचित युती झाल्याने निवडणुकीत प्रचाराचे काम मनापासून करणार नाही, अन्य पक्षातून पायघड्या घालून आणलेले सुभेदार शिरजोर झाल्यामुळे अगोदरच पक्षात असलेली खदखद कित्येक पटीने वाढणार व या साऱ्याचा फटका बसला आणि मागील वेळच्या १२३ जागांवरून अगदी १३५ ते १४० जागांवर मजल मारली तरी सत्तेचे धुपाटणे शिवसेनेच्या हाती राहणार. बरे मित्रप्रेम दाखवायला मित्र तरी त्या प्रेमाची सव्याज परतफेड करणारा आहे का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कारण मेट्रो कारशेडपासून अयोध्येतील राम मंदिरापर्यंत अनेक मुद्द्यावरुन शिवसेना भाजपला टोमणे लगावण्याची एकही संधी सोडत नाही.

वास्तव हे असले तरी लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत युतीचा शब्द दिला होता. आता शहा यांनी शब्द मोडणे याचा अर्थ मित्राशी दगाबाजी करण्यासारखे आहे. गरज असेल तेव्हा मित्रपक्षाला कडेवर घेऊन मुके घ्यायचे व गरज सरताच पटकून टाकायचे हे पुतनामावशीचे प्रेम भाजपला दूरगामी राजकारणात फटका देणारे ठरू शकते, असे दूरगामी राजकारणाचा विचार करणाऱ्या भाजपमधील काही मोजक्या मंडळींना वाटते. हल्ली कुठलीही निवडणूक हा कोट्यवधी रुपयांचा खेळ झाला आहे. उमेदवार निवडणुकीची तयारी दोन वर्ष अगोदरपासून करतात. त्यावेळी आचारसंहिता लागू होत नसल्याने तो खर्च हिशेबात धरला जात नाही. त्यामुळे रिंगणात उडी ठोकणाऱ्या उमेदवारांकरिता छोट्या-छोट्या बाबी महत्त्वाच्या असतात. युती झाली तर डोळे झाकून विजयी होऊ असे वाटणाऱ्यांचा दबाव मोठा असतो. शिवाय ही सगळी दोन्ही पक्षातील सत्ता उपभोगलेली, पैसा राखून असलेली मंडळी असल्याने त्यांचा दबाव हा सामान्य पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांपेक्षा जास्त असतो. त्यांचा मतदारसंघ सुरक्षित झाल्यामुळे त्यांना युती हवी असते. शिवसेनेतील आमदार हे तर युती व्हावी याकरिता सध्या देव पाण्यात घालून बसले आहेत. कारण युती तुटली तर भाजपच्या धनशक्तीपुढे टिकाव धरणे अशक्य होईल, याची त्यांना जाणीव आहे. भाजपमधील विद्यमान आमदारांनाही मनातून युती हवी आहे. कारण ओला किंवा सुका दुष्काळ हाताळण्यातील गफलतींपासून रस्त्यांच्या खड्ड्यांपर्यंत किंवा आयारामांच्या अतिक्रमणापासून महागाईपर्यंत कुठला मुद्दा विधानसभा निवडणुकीत फटका देईल हे सांगता येत नाही. भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून बरीच मंडळी आली आहेत. अनेकांवर भाजपच्या नेत्यांनीच आरोपांचे लांच्छन लावले होते. आता त्यांचे शुद्धीकरण झाल्याचा दावा भाजपचे नेतृत्व करीत असले तरी २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही आयारामांना भाजपच्या मतदारांनी नाकारले होते. आता गेल्या पाच वर्षांतील अँटीइन्कम्बन्सी सरकारसोबत आहे. त्यामुळे ज्या पश्चिम महाराष्ट्रात आपण कमकुवत आहोत तेथे आयारामांच्या भरवशावर मैदान मारू हे गृहीतक मतदारांनी लाथाडले तर भाजप तोंडघशी पडू शकते. हीच भीती भाजपच्या उमेदवारांनाही युतीच्या मागणीकरिता प्रेरणादायी ठरते.

लोकसभा निवडणुकीत मोदींकडे पाहून लोकांनी मते दिली. तो निकाल तसाच्या तसा विधानसभेला रिपीट होत नाही. अगदी एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीकरिता मते देतानाही मतदार वेगवेगळा विचार करतात हे यापूर्वीच्या काही निवडणुकांनी दाखवून दिले आहे.

अर्थात निवडणुकीचा नेमका निकाल काय लागेल हे सांगणे कठीण असले तरी एक गोष्ट खरी आहे की, यावेळी मित्रपक्षाच्या जोखडातून मोकळे होण्याची तीव्र इच्छा भाजपमधील अनेकांना आहे. यदाकदाचित युती तुटली व विधानसभेला भाजपने स्वबळावर सत्ता प्राप्त केली तर ती शिवसेनेकरिता धोक्याची घंटा असेल. केंद्रात अवजड उद्योग खात्याचा तुकडा चघळत ज्याप्रमाणे शिवसेना बसली आहे तशाच बिनमहत्त्वाच्या खात्याचा तुकडा राज्यातही शिवसेनेच्या पुढ्यात भिरकावून युती टिकवली जाईल. मात्र त्याचवेळी भाजप विनाविलंब शिवसेनेला सुरुंग लावेल. शिवसेनेतून गळती सुरु होईल. शिवसेनेच्या नेतृत्वाला याची कल्पना आहे. त्यामुळेच शिवसेनेचे नेतृत्व आम्हाला युती हवी, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात वगैरे सांगत आहे. कारण भाजपला मर्यादीत यश मिळावे ही शिवसेनेची इच्छा असेल तर युती करणे हाच सेनेसमोरील मार्ग आहे. रोषाचे अनेक मुद्दे असतानाही भाजपचा वारू चौफेर उधळला तर भाजपला रोखण्याचा दुसरा मार्ग नाही. पाच-दहा जागांवरुन युती तोडली व सगळे मैदान भाजपला मोकळे झाले आणि ते यदाकदाचित भाजपने मारले तर शिवसेनेचा खडतर काळ निकालापासून लागलीच सुरु होईल.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2019: the only way with shiv sena to stop bjp from Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.