कोरोनामुळे वाजायला लागली घराघरातली भांडी; जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 11:38 PM2020-03-31T23:38:13+5:302020-04-01T06:29:38+5:30

महिला आणि मुलांना होतोय त्रास

The house utensils caused by Corona; Increase in domestic violence worldwide | कोरोनामुळे वाजायला लागली घराघरातली भांडी; जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ

कोरोनामुळे वाजायला लागली घराघरातली भांडी; जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ

Next

ब्राझील/जर्मनी/चीन/पाकिस्तान

पूर्वी घरं कशी शांत होती.. घराघरात मुलाबाळांचा गोंगाट असला, नवरा-बायकोची भांडणं तेव्हाही होत असली, घराघरांतली भांडी एकमेकांवर वाजत असली तरी त्यांचा आवाज कर्णकर्कश नव्हता. थोड्या वेळानं ही भांडणं, हे मतभेद मिटून किंवा ते टाळून पुन्हा प्रत्येक जण आपापल्या मार्गाला लागत होता. संसाराची गोडी त्यात दिसून येत होती. पण कोरोनानं आता घराघरातलं हे चित्रही बदललं आहे. घराघरातली भांडणं आणि वाद आता हमरीतुमरीवर येऊ लागले आहेत. आणि अगदी पोलीस स्टेशनपर्यंतही ते जाऊन पोहोचताहेत. बरं, एखाद्याच ठिकाणची ही परिस्थिती नाही, अगदी जगभरात घराघरांतल्या भांडणांची संख्या वाढते आहे. जगभरातल्या तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बरं या भांडणांचं कारण तरी काय? भांडणांची कारणंही तशी नवीन नाहीत. बऱ्याचदा अगदी किरकोळच, पण घरातली सगळीच माणसं आता चोवीस तास एकमेकांच्या संपर्कात असल्यानं, एकमेकांच्या जवळ असल्यानं त्यांच्यातल्या उणिवा जोडीदारांना आता प्रकर्षानं जाणवायला लागल्या. भांडणांचं मूळ कारण हेच.पण यातली चिंतेची प्रमुख गोष्ट म्हणजे ही भांडणं आता हिंसाचारावर गेलीत आणि या घरगुती हिंसाचाराला जगभर सर्वाधिक बळी पडताहेत त्या स्त्रिया आणि मुलंच. ब्राझीलपासून ते जर्मनीपर्यंत, इटलीपासून ते चायनापर्यंत आणि अगदी भारतापासून ते पाकिस्तानपर्यंत. जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे.

चीनमध्ये ज्या ठिकाणी सर्वप्रथम कोरोनाचा उद्रेक झाला, त्या वुहानच्या हुबेई प्रांतातही घरगुती हिंसाचाराचा आकडा सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तिथल्या पोलिसांच्या माहितीनुसार, या हुबेई प्रांतातील घरगुती हिंसाचारात पूर्वीच्या तुलनेत अल्पावधीतच तब्बल तीन पटींनी वाढ झाली आहे.

हाच ‘पॅटर्न’ जगभरात सगळीकडे वाढतो आहे. ब्राझीलमध्येही घरगुती हिंसाचारात वाढ झाली असून महिला आणि लहान मुलं त्याचा बळी ठरताहेत. तिथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, सध्याचा लॉकडाऊनचा काळ आणि लोकांना सक्तीनं स्वत:ला होम क्वारंटाइन करावं लागत असल्यामुळे सक्तीनं एकत्र राहावं लागतंय, पण हा लॉकडाऊनचा काळ नसता तर दाम्पत्यांमधलं घटस्फोटांचं प्रमाण निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं असतं.

जर्मनीचा रिपोर्ट सांगतो, तिथेही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. कुटुंबांना सक्तीनं एकत्र राहावं लागतंय, नाहीतर ते कधीच विभक्त झाले असते. लॉकडाऊनचा काळ संपल्यावर कदाचित दाम्पत्य एकमेकांना कायमचा बायबाय करतील. जगातल्या या सगळ्याच ठिकाणी एक महत्त्वाचं साम्य आहे आणि ते म्हणजे केवळ कोरोनामुळे या घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे आणि त्याचं प्रमाण तब्बल ९० टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक आहे.

घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत अनेक देशांत लोकल हेल्पलाईन्सही चालवल्या जातात. त्या सगळ्याच हेल्पलाईन्सही सध्या तक्रारींनी भरभरून वाहताहेत. या हेल्पलाईन कर्मचाºयांचं तर म्हणणं आहे, यापूर्वी इतके बिझी आम्ही कधीच नव्हतो. नवरा-बायकोतली भांडणं सोडवताना आणि त्यांना शांत करताना आमच्या नाकी नऊ येतंय. ‘शांत बसा, समजून घ्या, चिडचीड करू नका, हीच वेळ आहे एकमेकांना साथ देण्याची’ असं सांगण्याशिवाय आम्हालाही दुसरा पर्याय कुठे आहे?..

Web Title: The house utensils caused by Corona; Increase in domestic violence worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.