शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सारेच मुसळ केरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 08:17 IST

भारताला ज्याची चिंता वाटत होती तेच अफगाणिस्तानात घडू लागले आहे. अफगाणिस्तानात वाढत आहे तालिबानचं वर्चस्व.

ठळक मुद्देभारताला ज्याची चिंता वाटत होती तेच अफगाणिस्तानात घडू लागले आहे.अफगाणिस्तानात वाढत आहे तालिबानचं वर्चस्व.

भारताला ज्याची चिंता वाटत होती तेच अफगाणिस्तानात घडू लागले आहे. ‘नाटो’च्या फौजा अफगाणिस्तानातून बाहेर पडल्या, की त्या देशात तालिबानचे वर्चस्व वाढू लागेल आणि भारताच्या हितसंबंधांना धक्का पोहचेल, अशी साधार भीती व्यक्त केली जात होती. ती फौजा पूर्णपणे बाहेर पडण्यापूर्वीच खरी ठरताना दिसत आहे. ऑगस्टअखेर अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर पडलेला  असेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे; मात्र जुलैचा पहिला पंधरवडा संपण्यापूर्वीच तालिबानने अफगाणिस्तानच्या सुमारे तीन-चतुर्थांश भूभागावर वर्चस्व प्रस्थापित केल्याच्या बातम्या त्या देशातून येत आहेत. विद्यमान राजवटीचे दिवस भरल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. त्यामुळेच भारताने त्या देशातील भारतीय नागरिकांना बाहेर काढणे सुरू केले असून, चारपैकी दोन वाणिज्य दूतावासदेखील बंद केले आहेत.

सत्तेबाहेरील कालखंडात तालिबानी नेतृत्वाच्या विचारसरणीत बदल झाला असावा आणि सत्ता मिळाल्यावर ते भारताशी जुळवून घेण्याचे धोरण अंगीकारतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. तिलाही तालिबानने धक्का दिला आहे. तब्बल २७५ दशलक्ष डॉलर्स खर्च करून आणि सुमारे दीड हजार अभियंते व कामगारांना जुंपून, भारताने अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात सलमा नावाचे धरण बांधले होते. ‘भारत-अफगाणिस्तान मैत्री बांध’ या नावानेही ते धरण ओळखले जाते.तालिबान्यांनी त्या धरणावरही ताबा मिळवला आहे.

अमेरिकन फौजांनी तालिबानला सत्तेतून उखडून फेकल्यानंतर, अफगाणिस्तानात जी निर्वाचित सरकारे सत्तेत आली, त्यांच्या कालखंडात भारताने त्या देशात जे विविध विकास प्रकल्प हाती घेतले होते, त्यापैकी सलमा धरण हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. गत काही वर्षात भारताने अफगाणिस्तानमध्ये तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केली. सलमा धरणाशिवाय त्या देशाच्या संसदेची नवी वास्तू उभारून दिली. अनेक रुग्णालये, वाचनालये, शाळा उभारल्या. काही महामार्ग बांधले. अफगाणी जनतेसोबत सुसंवाद प्रस्थापित करणे, त्यांच्या मनात भारताबद्दल विश्वास निर्माण करणे, या हेतूने ते विकास प्रकल्प राबविण्यात आले; मात्र आता सारेच मुसळ केरात जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडणार, हे स्पष्ट झाल्यापासूनच तो देश पुन्हा एकदा तालिबानी राजवटीखाली जाण्याची आशंका व्यक्त होत होती. तसे झाल्यास अफगाणिस्तानात भारताने केलेली गुंतवणूक पाण्यात जाईल आणि म्हणून भारताने तालिबानसोबतही वाटाघाटींचे दरवाजे किलकिले केले पाहिजेत, असा एका मतप्रवाह होता.

भारताने तालिबानसोबत संवाद बंद ठेवल्याने पाकिस्तानचे आयतेच फावते. त्यामुळे अफगाणिस्तानात कोण सत्तेत असावे, हे जर आपण नियंत्रित करू शकत नसू, तर जे सत्तेत येतील त्यांच्यासोबत सुसंवाद सुरू ठेवणे, हे अगदी तार्किक म्हणायला हवे. त्या दृष्टीने पडद्याच्या मागे काही प्रयत्नदेखील झाले असावेत; मात्र भारतासंदर्भातील भूमिकेवरून तालिबान्यांमध्येच दोन गट पडल्याने फार प्रगती झाली नसावी. तालिबानचा जहाल गट आणि हक्कानी गट हे भारताशी संबंध ठेवण्याच्या किंवा भारताला अफगाणिस्तानात कोणतीही भूमिका अदा करू देण्याच्या विरोधात आहेत. ते पाकिस्तानी भूमीतून त्यांच्या कारवाया करतात, हे त्यामागचे स्वाभाविक कारण आहे. दुसरीकडे कतारमधून कार्यरत असलेले तालिबानचे मवाळ गट मात्र भारतासोबत संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक आहेत. या गटाचे नेतृत्व विचारी आहे. 

देशाची पुनर्बांधणी व विकासासाठी विदेशी गुंतवणूक लागेल ती पाकिस्तान नव्हे, तर भारतच करू शकतो, हे ते जाणतात. भारत अफगाणिस्तानात महत्त्वपूर्ण भूमिका अदा करू लागल्यास, त्याचा प्रभाव ऊर्जासंपन्न मध्य आशियाई देशांमध्येही वाढू लागेल, इराणमधील चाबहार बंदर आणि अफगाणिस्तानच्या मार्गे भारत त्या देशांमधून थेट खनिज तेल, नैसर्गिक वायू आयात करू शकेल आणि त्या देशांना निर्यातही वाढवू शकेल ! चीन आणि पाकिस्तानला ते नको आहे. त्यामुळे आगामी काळात ते दोन्ही देश तालिबानला हाताशी धरून अफगाणिस्तानात गतिविधी वाढवतील, हे निश्चित! तालिबानची शस्त्रास्त्रांची गरज भागवून त्या बदल्यात अफगाणिस्तानी भूमीचा शक्य होईल तसा वापर करून घेण्याचा प्रयत्न चीन नक्कीच करेल. आतापर्यंत सोविएत रशिया आणि अमेरिकेने अफगाणिस्तानात हात पोळून घेतले आहेत. कदाचित पुढील पाळी चीनची असू शकेल. तोपर्यंत तालिबानी राजवटीचा देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ न देण्याची काळजी घेणे, एवढेच भारताच्या हाती असेल!

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाIndiaभारतDamधरण