Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 19:10 IST

प्राप्त अर्जांची लॉटरी ५ जून रोजी

मुंबई : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या  मुंबईतील विवध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकंच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडत प्रणालीमधील ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज स्वीकृती व अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा प्रक्रियेला १४ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार १४ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील व १५ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. तसेच १५ मे रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. 

२२ मे रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. २५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. २९ मे रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.  सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ५ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सोडतीचे स्थळ मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.   मुंबई मंडळातर्फे ३० मार्च रोजी मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील २६४० सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत जाहीर करण्यात आली.  

अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी १४०८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी २२९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेल्या १७६२ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७१ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त १८८ सदनिका तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या ३१९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

जाहीर सोडतीतील सदनिकांच्या किंमती म्हाडाच्या प्रचलित धोरणानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत विकासकांकडून प्राप्त सदनिका 'जशा आहे त्या स्थितीमध्ये' विक्रीकरिता उपलब्ध आहेत. म्हाडातर्फे या सदनिकांची ताबा देण्यापूर्वी डागडुजी, दुरूस्ती करून दिली जाईल. तसेच यशस्वी अर्जदाराला सोडतीत लागलेल्या सदनिकेचा मालमत्ता कर व सहकारी गृहनिर्माण संस्थेचा देखभाल खर्च थकीत असल्यास म्हाडातर्फे त्याची अदायगी करूनच सदनिकेचा ताबा यशस्वी अर्जदारांना दिला जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Lottery Extended: Apply for 2640 Homes Until May 14

Web Summary : MHADA extends the application deadline for 2640 Mumbai homes to May 14. Online applications and payments are now open until mid-May. The lottery draw is scheduled for June 5, offering homes across various income groups in Mumbai projects.
टॅग्स :म्हाडा लॉटरी