नागपूर : गेल्या १४ एप्रिल रोजी संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी प्रचंड ध्वनी प्रदूषण केले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आयोजकांसह समाजाला बाबासाहेबांचे विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली. बाबासाहेबांची जयंती केवळ त्यांच्या जीवनाचा उत्सव नसून त्यांच्या विचारसंपत्तीला आणि समाजसुधारणेच्या कार्याला आदरांजली आहे. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे केवळ त्यांच्या शब्दांची आठवण नव्हे, तर त्यांच्या समता, न्याय आणि प्रगतीच्या दृष्टिकोनाचा सन्मान करणे आहे. त्यांचे जीवन, तत्त्वज्ञान आणि लेखनाचा विचार केल्यास त्यांनी बौद्धिक प्रगती, सामाजिक सुधारणा आणि सक्षमीकरणावर भर देणारा जयंती उत्सव पसंत केला असता. वंचितांचे उन्नयन, महिला सक्षमीकरण आणि जातीय भेदभाव निर्मूलनावर भर दिला असता. परंतु, त्यांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, असे न्यायालय म्हणाले.शहरातील ध्वनी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात चार याचिका प्रलंबित आहेत. त्यावर न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयमित्र ॲड. अब्दुल सुभान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधील मोठा आवाज, घोषणाबाजी आणि फटाके फोडणे यामुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती दिली. न्यायालयाने ही बाब गंभिरतेने घेऊन बाबासाहेबांच्या विचारांसह संविधानाचे तत्व व कायद्याचे महत्व स्पष्ट केले. बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. ते मानवाधिकारांचे रक्षक, महान तत्त्वज्ञ, समाजवादी, अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक, राजकारणी आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध बुद्धिजीवी होते. त्यांनी, “आपण जीवन देऊ शकत नाही, त्यामुळे ते हिरावून घेण्याचा किंवा इतरांचे शोषण करण्याचा अधिकार आपल्याला नाही.”, असे म्हटले आहे.“स्वातंत्र्य आणि स्वैराचार” याबाबत ते मानत की, स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होता कामा नये. त्यामुळे स्वतःचे हक्क जपताना इतरांच्या हक्कांचा आदर करणे आवश्यक आहे. त्यांनी नेहमीच ठामपणे सांगितले की, प्रत्येक व्यक्तीस आपल्या घरात शांतता आणि आरामाचा अधिकार आहे. मोठा आवाज वृद्ध, आजारी व्यक्ती तसेच मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतो. पक्ष्यांवरही परिणाम होऊन ते घरटी सोडतात किंवा दिशाभूल होतात, असे न्यायालयाने नमूद केले.आयोजकांना विचारला परखड प्रश्न -बाबासाहेबांच्या जयंतीचे आयोजन करताना त्यांच्या तत्त्वांचा प्रसार केला जात आहे का, असा परखड प्रश्नही न्यायालयाने आयोजकांना विचारला. तसेच, आयोजकांना यासंदर्भात पोलिस आयुक्तांमार्फत नोटीस जारी करण्यात यावी आणि आयोजकांनी यावर येत्या ९ जूनपर्यंत स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश दिले. याशिवाय, पोलिस आयुक्तांनी नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलली, याची माहिती द्यावी, असे सांगितले.
Web Summary : High Court reminds that Babasaheb's philosophy opposes noise pollution. Celebration means honoring equality, justice, progress, not noise. Court questions event organizers, seeks explanation.
Web Summary : उच्च न्यायालय का कहना है कि बाबासाहेब का दर्शन ध्वनि प्रदूषण के खिलाफ है। उत्सव का अर्थ है समानता, न्याय, प्रगति का सम्मान, न कि शोर। कोर्ट ने आयोजकों से सवाल किया, स्पष्टीकरण मांगा।