‘डॉगपायलिंग’- वाहत्या गंगेत आपणही हात धुऊन घ्या! सोशल मीडियात टीकेचा भडीमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 08:35 IST2026-05-02T08:34:47+5:302026-05-02T08:35:18+5:30
सोशल मीडियावर बऱ्याचदा एखाद्या विषयावर रणकंदन माजते. पण पूर्ण माहिती नसतानाही काही या टीकेत सहभागी होतात व हात धुऊन घेतात.

‘डॉगपायलिंग’- वाहत्या गंगेत आपणही हात धुऊन घ्या! सोशल मीडियात टीकेचा भडीमार
सोशल मीडियावर कुणीतरी काहीतरी पोस्ट करतो. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात होते आणि एक वेळ अशी येते की येणाऱ्या प्रतिक्रिया या टोकाच्या नकारात्मक होत जातात. त्या पोस्टबद्दल नकारात्मक मत असणाऱ्या वर्तुळात ती पोस्ट पसरण्यास सुरुवात होते आणि सोशल मीडियावरची माणसे व्हर्च्युअलीच त्या लिहिणाऱ्या व्यक्तीवर अक्षरशः तुटून पडतात. ऑनलाइन वर्तुळात मानवी वर्तन चांगल्या किंवा वाईट प्रकारे कसे टोकाचे होते त्याला आधुनिक परिभाषेत ‘डॉगपायलिंग’ असे म्हटले जाते. या प्रकारात सुरुवातीला किरकोळ प्रमाणात असलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया हळूहळू प्रचंड प्रमाणात वाढत जातात आणि ती व्यक्ती जबरदस्त टीकेची धनी होते. त्या व्यक्तीवर सगळीकडून टीकेचा भडीमार व्हायला लागतो.
त्या पोस्टचा उद्देश, त्यावर होणारी चर्चा हे सगळे काही क्षणांत बदलते आणि तिथे उमटणाऱ्या प्रतिक्रिया या मूळ मजकूर आणि त्यातील आशयापेक्षा महत्त्वाच्या ठरतात. हे ‘डॉगपायलिंग’ असते. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबाबतीत जे घडले ते डॉगपायलिंगचे चपखल उदाहरण आहे. राघव यांनी पक्ष बदलानंतर सुमारे एक मिलियन फॉलोअर्स गमावले. त्यांच्या सोशल मिडियावर नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला आणि भरीस भर म्हणून त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीकाही झाली. ‘आयकॉन’ म्हणून जे तरुण राघव यांच्याकडे पहात होते त्यांचा यात प्रचंड प्रमाणात सहभाग होता.
डॉगपायलिग म्हणजे फक्त मतभेद नव्हे तर त्याची व्याप्ती आणि तीव्रताही लक्षात घेण्यासारखी असते. साधारण चर्चेत लोक आपले विचार मांडतात, एकमेकांना आव्हान देतात आणि काहीवेळा त्यातून तोडगाही निघतो. डॉगपायलिंगमध्ये ते होत नाही. अनेक जण त्यात स्वतःची काहीही भर न घालता एकाच टीकेची पुन्हा पुन्हा री ओढतात. ज्या विषयावर हे रणकंदन माजलेले असते त्याची पूर्ण माहिती नसतानाही काही जण वाहत्या पाण्यात हात धुवून घेतल्यासारखे या टीकेत सहभागी होतात. अर्थात् यात सोशल मीडिया अल्गोरिदमचा सहभागही मोठा असतो. ज्या पोस्ट्सवर तीव्र, नकारात्मक प्रतिक्रिया येतात त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतात.. त्यामुळे बघता बघता हे सगळे वाढत जाते. अर्थात याला एक वेगळी बाजूही आहे. शेकडो किंवा हजारो प्रतिक्रिया एका व्यक्तीकडे वळतात तेव्हा योग्य टीकाही असमतोल वाटू शकते. काही मोजक्या लोकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने काही वेळा त्या व्यक्तीने लिहिलेले असते, पण असा प्रचंड प्रतिसाद आला तर तो हाताळणे त्या व्यक्तीला कठीण होऊ शकते.
डॉगपायलिंगचे परिणाम दूरगामी असतात. सोशल मीडियावर अशा प्रकारे टीकेची झोड उठवून घेण्याच्या भीतीने लोक संवेदनशील विषयांवर आपली मते व्यक्त करणे टाळतात किंवा फक्त सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास पसंती देतात. आपण टीकेचे लक्ष्य होऊ नये यासाठी त्यांना हा मार्ग पत्करावासा वाटतो. दुसरा धोका म्हणजे तथ्य जाणून न घेताच प्रतिक्रिया देणे हा प्रघात पडतो. त्यातून चुकीची माहिती पसरण्याचा आणि तीच खरी वाटण्याचा धोका असतो. डॉगपायलिंग ही प्रचलित ‘इंटरनेट स्लँग’ असली तरी त्या निमित्ताने सोशल मीडिया आणि त्यावरील लोकांचा सामुहिक वावर कसा बदलत चालला आहे याची प्रचिती येते.