ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:44 IST2026-05-02T16:43:15+5:302026-05-02T16:44:34+5:30
ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि चित्रपट निर्माते डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ठाणे : ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर यांचे आज सकाळी १० वाजता वयाच्या ७२ व्या वर्षी ठाणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, दोन मुली, जावई त्यांची पत्नी, एक नातू असा परिवार आहे. ठाण्याच्या शैक्षणिक साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली चाळीस वर्षे सातत्याने ते कार्यरत होते. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले.
साहित्यातील विविध विषय आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळणारे डॉ. घुमटकर हे अनेक नामवंत साहित्यिकांमधून आपले वेगळेपण सिद्ध करीत असत , त्यांना आत्तापर्यंत ठाणे जिल्हा साहित्यरत्न पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत लाभलेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे त्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता.
डॉ. घुमटकर यांनी घुमटकर क्लासेस, घुमटकर इंजिनिअरिंग कॉलेज आदी शिक्षण संस्थांमार्फत हजारांच्यावर विद्यार्थ्यांना शिकविले आहे.चित्रपट कसा काढावा?,तऱ्हेवाईक नातेवाईक, विचित्र विश्व,विद्रोही जोतिबा, गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळले आहे. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष-डॉ. बाबासाहेब आंबेडकर-शोध आणि बोध या प्रबंधाला तर राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा लाभला होता. डोंबिवली येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती.पण त्यांना अपयश आले होते. पण अपयशाने खचून न जाता त्यांचा साहित्य प्रवास सुरू ठेवला होता. होणार सून मी त्या घरची, वैरी मंगळसूत्राचा,महिमा काळभैरवाचा, आमदार माझ्या खिशात, भक्ती नागनाथाची, धाव रे विठ्ठला,एक डाव सत्तेचा आणि भानामती हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत.