७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:08 IST2026-05-02T17:01:18+5:302026-05-02T17:08:56+5:30

धोनीच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्याने श्रीलंका ते भारत हे अंतर पोहून पूर्ण केले आहे.

7 Year Old Ishank Singh From Ranchi Sets World Record by Swimming Across Palk Strait | ७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद

७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद

Ishank Singh: जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर रांचीच्या अवघ्या ७ वर्षांच्या इशांक सिंहने जागतिक विक्रम केला आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यातील अरुंद पण अत्यंत आव्हानात्मक मानली जाणारी पाल्क सामुद्रधुनी पोहून पार करत इशांकने नवा इतिहास रचला आहे. ३० एप्रिल रोजी पार पडलेल्या या मोहिमेत त्याने २९ किलोमीटरचे अंतर अवघ्या ९ तास ५० मिनिटांत पूर्ण केले.

इशांकने श्रीलंकेतील तलैमन्नार येथून आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि तामिळनाडूतील धनुषकोडी येथे पोहोचून आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. समुद्रातील उंच लाटा आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे हे अंतर पार करणे मोठे आव्हान होते, मात्र इशांकने हे यश मिळवले. इशांक सध्या जवाहर विद्या मंदिर  या शाळेत तिसरीत शिकत असून, ही तीच शाळा आहे जिथे क्रिकेटपटू एम.एस. धोनीने शिक्षण घेतले होते.

कठोर मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

इशांकच्या या यशामागे त्याची आई मनीषा सिन्हा आणि प्रशिक्षक अमन कुमार जयस्वाल व बजरंग कुमार यांचे मोठे योगदान आहे. इशांकने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोहण्यास सुरुवात केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून त्याने धुरवा धरणाच्या पाण्यात दररोज सात ते आठ तास सराव केला होता. इशांकमध्ये बालपणापासूनच विलक्षण स्टॅमिना असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी इशांकला यंगेस्ट अँड फास्टेस्ट पाक स्ट्रेट स्वीमर आणि २०२६ ओडब्ल्यूएसएटी वर्ल्ड रेकॉर्ड या दोन महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यापूर्वीचा विक्रम तामिळनाडूच्या जय जसवंतच्या नावावर होता, जो आता इशांकने मोडीत काढला आहे.

आता पुढचे ध्येय पाल्क सामुद्रधुनीचे दुहेरी अंतर

रांचीमध्ये परतल्यानंतर इशांकचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्याने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, "मला अजून सुधारणा करायची आहे. पाल्क सामुद्रधुनीचे टू-वे अंतर पोहून पार करणे हे माझे पुढचे स्वप्न आहे".

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी इशांकचे अभिनंदन करताना त्याची कामगिरी शिस्त आणि समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे म्हटले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक बी.एन. झा आणि इतर मान्यवरांनीही इशांकने शाळेचे आणि देशाचे नाव उज्वल केल्याचे सांगत त्याचे कौतुक केले आहे.

Web Title : 7 वर्षीय इशांक ने श्रीलंका से भारत तैरकर विश्व रिकॉर्ड बनाया

Web Summary : 7 वर्षीय इशांक सिंह ने 9 घंटे 50 मिनट में श्रीलंका से भारत तक 29 किमी तैरकर विश्व रिकॉर्ड बनाया। अब उसका लक्ष्य पाक जलडमरूमध्य की दोगुनी दूरी तैरना है। युवा उपलब्धि हासिल करने वाले इशांक की प्रशंसा हो रही है।

Web Title : 7-Year-Old Ishank Swims Sri Lanka to India, Sets World Record

Web Summary : Ishank Singh, 7, swam 29km from Sri Lanka to India in 9 hours 50 minutes, setting a world record. He aims to swim the Palk Strait's double distance next. The young achiever is being lauded for his dedication.