आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे वाढते दर आणि युद्धाच्या छायेत सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणे सुरूच आहे. तेल कंपन्यांनी १ मे रोजी व्यावसायिक आणि ५ किलोच्या छोटू सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. विशेष म्हणजे, ५ किलोच्या सिलिंडरचे दर आता घरगुती १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमतीच्या अगदी जवळ पोहोचले आहेत आणि व्यावसायिक सिलिंडरच्यापेक्षाही जास्त झाले आहेत.
छोटू सिलिंडर आता आवाक्याबाहेर?
१ मे पासून ५ किलोच्या छोटू सिलिंडरच्या किमतीत २६१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे या सिलिंडरची किंमत ५५२.५० रुपयांवरून थेट ८१३.५० रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर दिल्लीत अजूनही ९१३ रुपयांना मिळत आहे. म्हणजेच केवळ १०० रुपयांच्या फरकात घरगुती सिलिंडरमध्ये ३ पट जास्त गॅस मिळत आहे. एवढेच नाही तर व्यावसायिक सिलिंडर हा १९ किलोंचा आहे, तो आता ३०७१ रुपयांना मिळत आहे. यावनुसार प्रति किलोचा हिशेब काढला तर खालीलप्रमाणे येत आहे.
प्रति किलो गॅसचा हिशोब (गणित):
घरगुती सिलिंडर (१४.२ किलो): साधारण ६३ रुपये प्रति किलो.
छोटू सिलिंडर (५ किलो): साधारण १६२.६० रुपये प्रति किलो.
व्यावसायिक सिलिंडर (१९ किलो): साधारण १६१.७० रुपये प्रति किलो.
या गणितानुसार, ५ किलोचा सिलिंडर वापरणे आता सर्वात महाग पडत आहे.
कोणाला बसणार फटका?
पत्ता किंवा आयडी प्रूफशिवाय सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी, स्थलांतरित मजूर आणि छोटे चहा विक्रेते या छोटू सिलिंडरचा वापर करतात. मात्र, या प्रचंड दरवाढीमुळे या घटकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. दरम्यान, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही ९९३ रुपयांची वाढ होऊन तो आता ३०७१ रुपयांवर पोहोचला आहे.
