कोरोनाचे खापर ‘५ जी’वर फोडण्यात अर्थ आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 07:41 AM2021-05-14T07:41:46+5:302021-05-14T07:43:36+5:30

भारतात सरकारी आकड्यांनुसार कोरोनामुळे २ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील उच्चविद्याविभूषित पंडित हे सारे मृत्यू ५-जी टेस्टिंगमुळे झाल्याचे सांगत आहेत.

Does it make sense to blow Corona's khapar on 5G? | कोरोनाचे खापर ‘५ जी’वर फोडण्यात अर्थ आहे का?

कोरोनाचे खापर ‘५ जी’वर फोडण्यात अर्थ आहे का?

Next

- साहेबराव नरसाळे, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, अहमदनगर

‘५-जी लहरींच्या रेडिएशनमुळे कोरोना होऊन लोक चिमण्यांसारखे मरत आहेत,’  असा मेसेज फॉरवर्ड होऊन आला, तर तुम्ही काय कराल?

- हॅलो... सरजी क्या हाल है बनारस का? 
- बस ठीक है. 
- इधर तो चिडियाँ जैसे आदमी मर रहे है. 
- अरे हाँ.. वो ५-जी टेस्टिंग चल रहा है ना. पहले चिडियाँ मरती थी, आज आदमी मर रहे है.. 
फोनवरील हा संवाद ५-जी टॉवर उभारणाऱ्या दोन अधिकाऱ्यांमधील असल्याचे सांगून सध्या कचाकच फॉरवर्ड केला जात आहे. सुमारे ७ मिनिटांच्या या संवादासोबत काही छायाचित्रेही येतात. परदेशात ‘५-जी’विरोधात लोक रस्त्यावर उतरल्याची छायाचित्रे. त्याखाली पुन्हा एक मेसेज, ‘५-जी टेस्टिंग बंद करो.. इन्सानों को बचाओ.’ ५-जीमुळेच कोरोना वाढत असून, लोक चिमण्यांसारखे मरत आहेत, असे सांगणारा हा मेसेज सध्या व्हायरल आहे.

 पण, खरेच ५-जी लहरींच्या रेडिएशनमुळे लोक मरत आहेत का, याची पडताळणी न करताच हा मेसेज वेगाने फॉरवर्ड केला जात आहे.  सोशल मीडियावर ‘स्टॉप ५-जी’ नावाने एक चळवळ राबविली जात आहे. या चळवळीत अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टर, तत्त्वज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी असल्याचा दावा करीत अफवा पसरविल्या जात आहेत.  अलीकडेच ५-जी विरोधात अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा यूके सरकारने दिला अन् तेथे तरी हा अफवांचा बाजार थांबला. 

भारतात सरकारी आकड्यांनुसार कोरोनामुळे २ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील उच्चविद्याविभूषित पंडित हे सारे मृत्यू ५-जी टेस्टिंगमुळे झाल्याचे सांगत आहेत. खरेच भारतात ५-जीचे टेस्टिंग सुरू आहे का? भारतात आतापर्यंत ५-जीचे किती टॉवर उभे राहिले आहेत? ५-जी रेडिएशनमुळे मानवी जीवनास किती प्रमाणात धोका आहे?- सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉ. एस.पी. कोच्चर सांगतात, “भारतात अजून ५-जी टॉवर उभारलेले नाहीत. टेस्टिंगही सुरू झालेले नाही. भारतात फक्त ५-जी टॉवर उभारण्यास मान्यता दिलेली आहे. कोरोनाचा आणि ५-जीचा काहीही संबंध नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनेही सांगितले आहे!”

कोरोनाचा व्हायरस रेडिओ लहरी किंवा मोबाइल नेटवर्कद्वारे पसरू शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे.  जगभरात जेथे ५-जी सुरूच झालेले नाही, तेथेही कोरोनाचा उद्रेक पाहावयास मिळत आहे. ५-जीमुळे कोरोना वाढतो व लोकांचा मृत्यू होतो, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

कोरोना वाढीस ५-जी रेडिएशन कारणीभूत असल्याचा उल्लेख वारंवार केला जातो. हे रेडिएशन नेमके आहे तरी काय? तर, रेडिएशन म्हणजे किरणोत्सार. वायरलेस संवादाच्या तंत्रज्ञानात रेडिओ लहरी वापरल्या जातात. या रेडिओ लहरींच्या निर्मितीसाठी विद्युतभारीत किरणांचा वापर होतो. यातून किरणांचे उत्सर्जन केले जाते. त्याला रेडिएशन किंवा किरणोत्सार म्हणतात. हे किरणोत्सार दोन प्रकारचे असतात. एक आयोनायझिंग आणि दुसरा नॉन आयोनायझिंग. रेडिओ लहरींमध्ये नॉन आयोनायझिंग किरणोत्सार कमी तीव्रतेचे असतात. याउलट, आयोनायझिंग किरणोत्सार उच्च तीव्रतेचे असतात. यामध्ये क्ष-किरण (एक्स-रे), गामा-किरण (सिटी स्कॅनसाठी वापर) असतात. ही दोन्ही किरणे वैद्यकीय कारणांसाठी वापरली जातात. रेडिओ, टीव्ही सिग्नल, मोबाइल या बिनतारी संदेशवहनात नॉन-आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे अ-विद्युतभारित किरणोत्साराचा वापर होतो. याद्वारे कोणत्याही विषाणूंचे वहन होऊ शकत नाही, असे अमेरिकेत झालेल्या संशोधनात म्हटलेले आहे. त्यामुळे कोरोनावाढीस अथवा सध्याच्या परिस्थितीत होत असलेल्या मानवी मृत्यूस ५-जी कारणीभूत आहे, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच, यूकेमध्ये अशा अफवा पसरविणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा नियम झाला आहे. हा नियम करतानाही तेथील प्रशासनाने भारताचे उदाहरण दिले आहे. भारतात ५-जी अजून पोहोचायचे आहे, तरीही तेथे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 
- म्हणूनच, ५-जीमुळे कोरोना वाढला, असा समज पसरविणे चुकीचे आहे; आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा आहे.
 

Web Title: Does it make sense to blow Corona's khapar on 5G?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.