विशेष लेख: युद्धकाळात बॉम्ब पडून काय फक्त माणसंच मरतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:32 IST2026-04-15T11:29:55+5:302026-04-15T11:32:11+5:30

War News: युध्दकाळात जमिनीत बंकर खोदून माणसं आपला जीव वाचवतात, पण बॉम्बवर्षावात होरपळणाऱ्या झाडे-वेली, प्राणी-पक्षी यांचं काय?

Do only humans die from bombs during war? | विशेष लेख: युद्धकाळात बॉम्ब पडून काय फक्त माणसंच मरतात?

विशेष लेख: युद्धकाळात बॉम्ब पडून काय फक्त माणसंच मरतात?

- शुभांगी गबाले
युद्ध ही जैविक गरज नाही आपली. मानवी उत्क्रांतीत रचत आखत नेलेला हा कुरघोडीचा एक हिंस्त्र खेळ. हातात नांगर आले आणि पाठोपाठ शस्त्रंही. शेतीभोवती कुंपणं आली आणि सत्तासंघर्षाची आदिम गरज उगम पावली. वाहतेच आहे अजूनही ती सगळे धरबंद मोडूनतोडून. नैसर्गिक उलथापालथीत जगूनतगून राहणं ही माणसाची मुख्य गरज. समंजस परस्परावलंबन अन् तडजोडीचं सहजीवन हे सारं माणसांना निसर्गाने शिकवलं. प्रगत होत राहणारा मानवी मेंदू हे सगळं समजून आहे आणि तरीही त्याला हवी आहे सतत सत्ता, मालकी, नियंत्रण! त्यासाठीच तर युध्दं पेटतात. लढवली जातात. मग चर्चा होतात. समझोत्याची भाषा होते. करार - मदार. शांतीवार्ता. त्या कधी सफल होतात, कधी फिस्कटतात.

पण, या सगळ्यात् आपण एक विसरतो आहोत, की माणसांच्या पलीकडेही एक समांतर दुनिया जगत, वाढत असते. झाडा-पानांची, काट्या-वेलींची गच्च गर्द हिरवी दुनिया. जिला  प्रत्येक लहान - मोठ्या संघर्षात हमखास वेठीला धरलं जातं. युध्दखोर माणसांना जमीन हवी असते; पण, जमिनीसोबत झाडं वेली येतात. आंबट, गोड फळं आणि उमलायला अधीर कळ्या येतात. प्राणी येतात. पक्षी असतात. या सगळ्यांच्या होरपळीचा विचार युध्दात गुंतलेली माणसं कधीतरी करतात का?

भक्कम घरं, आडोसे बांधून, जमिनीत बंकर खोदून माणसं जीव वाचवायला शिकली आहेत माणसांनीच केलेल्या हल्ल्यांपासून; पण  समांतर दुनियेतल्या  हिरव्या जगाला माहीतच नसतं ना असं काही शिजतंय माणसांच्या जगात. ते आपले तल्लीन होऊन जगत असतात, येत्या ऋतुकडे डोळे लावून.  एका स्फोटाच्या ठिणगीत गुडुप होऊन जातं हे सगळं. कुठलाच मागमूस मागे न सोडता. ना त्याची दखल, ना कसली नोंद.

माणसा-माणसांच्या युध्दांत माणसांबरोबरच झाडं, वेली, जंगलं, शेतं वाचली पाहिजेत, अशी तजवीज कोणत्या पॉलिसीमध्ये असते? या हिरव्या नि:शस्त्र दुनियेचं अस्तित्व गृहीतच धरलंय कायम. बहरलेली वनं एकतर काबीज करायची, नाहीतर उद्ध्वस्त. येणारा उत्क्रांतीचा इतिहास उद्ध्वस्ततेच्याच कहाण्यांनी रचला जाणार आहे का?
गाझा आणि बाजूच्या अरब मुलुखाला  बेंजामिन नेतन्याहूंनी ‘जंगल’ म्हटलं होतं. म्हणजे ते उद्ध्वस्त करायच्याच लायकीचं आहे अशा गुर्मीत? - या गुर्मीला प्रश्न कोण विचारणार? शिक्षा कोण करणार?

आकाशातून बॉम्बवर्षाव होताना, क्षेपणास्त्र येऊन आदळताना माणसांच्याही आधी युध्दभूमीवरचं पर्यावरण पोळून निघतं. मुक्या सजीवांचं सहजीवन पहिल्यांदा बळी ठरतं. पण, ‘व्हिक्टिम कार्ड’ वापरायची, समझोते आणि करार करण्याची, नुकसानभरपाई मागण्याची सवलत त्यांना नाही. माणूस निदान निर्वासित बनून दुसरा आसरा  शोधू शकतो. जगण्याचा डाव नव्याने मांडू शकतो. पण, झाडा-झुडपांना हा पर्याय नाही. ना न्याय मागायचा, ना निषेध नोंदवायचा. नशिबी फक्त होरपळ!

थेट निसर्गालाच आहुती बनवून लढली गेलेली युद्धं तर मानवी विकृतीच्या सगळ्या कसोट्या ओलंडणारी. व्हिएतनाम युद्धात अमेरिकन फौजांनी वापरलेल्या ‘एजंट ऑरेंज’ या रसायनाची बेरहम गोष्ट शोधायला गेलात तर सापडेल लगोलग. हे विष फवारून लाखो एकरांवरची जंगलं, शेतं थेट नष्ट करून टाकली गेली त्याची गोष्ट. शत्रूला बचावाचा कुठलाच मार्ग शिल्लक राहायला नको म्हणून चालवलं गेलेलं हे मिशन. पर्यावरणाच्या इतिहासातली ही सगळ्यात निलाजरी पानं. जिथे तिथे काळवंडून पडलेली झाडांची कलेवरं. त्यांना लगडून असलेल्या वेलींचीही. फांद्या शोधत भिरभिरणारी पाखरं आणि अचानक उजाड झालेलं आपलं घरदार बघून भेदरलेले मुके जीव. संहाराची इतकी क्रूर भाषा नेमकी कशातून जन्मत असावी? आणि अशा कित्येक संहारांना पुरून उरत सृष्टीचं निरंतर चक्र सुरूच राहतं. शस्त्रास्त्राच्या निशाणांवर उद्ध्वस्ततेची समीकरण मांडली जाताना, श्वास न श्वास वेठीस धरले जात असताना, आगीचे लोळ उठत असतानाही सृष्टीची लय थांबत नाही.

जगभरात युध्दं पेटली आहेत; आणि हवा वाहते आहे, ढगांचे पुंजके सरकत आहेत, उगवत्या सूर्याला पाहून कुठल्याशा कोपऱ्यातलं रोपटं पानात उर्जा भरून घेत आहे; याचं भान तरी आहे का सत्तासंघर्षात आंधळ्या झालेल्या माणसांना? मौनातली पृथ्वी साक्षीदार आहे या विद्ध्वंसाची. धुराच्या लोटात पसरत चाललेल्या या काळोखाला थोपवण्याचा मार्ग  तिच्याकडे नाही. कित्येक पिढ्यांची वाताहत ती फक्त बघत राहणार. सतत धगधगत्या युध्दांमधलं विष पिऊन भयंकर दूषित होत राहणार. हवा, पाणी, माती, अन् उखडत राहणारे नैसर्गिक अधिवास... ऋतू चुकवत कोसळत राहणारा पाऊस, बांध तोडून सैरभैर झालेल्या नद्या आणि उसळणारी वादळं... या कशाचंच उत्तर तिच्याकडे नाही.

Web Title : युद्ध के शिकार: बमबारी में इंसानों के साथ प्रकृति भी मरती है।

Web Summary : युद्ध केवल मानव जीवन को तबाह नहीं करते, बल्कि पर्यावरण को भी नष्ट करते हैं। संघर्ष में अक्सर अनदेखी की जाने वाली वन, खेत और वन्यजीव हताहत होते हैं। लेख पूछता है कि क्या नीतियां युद्ध के दौरान प्राकृतिक दुनिया की पर्याप्त सुरक्षा करती हैं और सैन्य कार्रवाइयों से होने वाले दीर्घकालिक पारिस्थितिक नुकसान पर प्रकाश डालती हैं।

Web Title : War's victims: Bombs kill more than humans; nature suffers too.

Web Summary : Wars devastate not only human lives but also the environment. Forests, fields, and wildlife become casualties, often overlooked in conflict. The article questions if policies adequately protect the natural world during wartime and highlights the long-term ecological damage caused by military actions.