Beijing now has more billionaires than any city | जाऊ श्रीमंतांच्या शहरी; पाहू भांडवलदारांच्या नगरी

जाऊ श्रीमंतांच्या शहरी; पाहू भांडवलदारांच्या नगरी

विसाव्या शतकात जगभरातील गरिबांच्या संख्येची नेहमी चर्चा होत असे. एकविसाव्या शतकात श्रीमंती आणि श्रीमंतांच्या शहरांची नोंद घेऊन आकडेवारी जाहीर होत आहे. अर्थातच त्यांच्या संपत्तीची मोजणी अमेरिकन डॉलर्समध्ये होत असल्याने भारतीय चलनात हा आकडा डोंगराएवढा मोठा वाटतो. ‘फोर्ब्स’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगभरातील दहा टॉप शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे. मुंबईत आता अब्जाधीशांची संख्या अठ्ठेचाळीस झाली आहे. ‘फोर्ब्स’ आजवर सर्वाधिक श्रीमंत तसेच अब्जाधीशांची यादी जाहीर करीत होते. त्यांनी आता कोणत्या शहरात किती अब्जाधीश राहतात, याची यादी जाहीर केली आहे.भांडवलशाहीला पर्याय देण्याचा दावा करणाऱ्या कम्युनिस्ट चीनची राजधानी बीजिंग शहराने अब्जाधीशांच्या संख्येसह पहिला क्रमांक पटकाविला आहे. अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सर्वाधिक अब्जाधीश राहतात. मात्र, बीजिंगने प्रथम क्रमांक पटकाविला असला, तरी १०१ अब्जाधीशांची एकूण संपत्ती ४८४ बिलियन डॉलर्स आहे, तर न्यू यॉर्क संख्येने दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्यांची एकूण संपत्ती ५६० बिलियन डॉलर्स आहे. त्यांपैकी एकतृतियांश संपत्ती जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती न्यू यॉर्कचे मिचेल ब्लुमबर्ग यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे चीनच्या पाच शहरांतील अब्जाधीशांची संख्या जगातील पहिल्या दहा टॉप शहरांमध्ये आहे. त्यात अमेरिकेतील दोन शहरे, तर भारत, रशिया आणि इंग्लंडमधील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे. हा केवळ आकडेवारीचा खेळ नाही, तर अर्थव्यवस्था कोणत्या क्षेत्रावर चालते, कोणत्या उत्पादनावर पुढे सरकते किंवा कोणत्या सेवाक्षेत्रात गुंतवणुकीस अधिक वाव आहे, याचे दिशादर्शकपण आहे.‘फोर्ब्स’ने भारतातील अब्जाधीशांची यादीही जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे रिलायन्स ग्रुपचे मुकेश अंबानी यांना केवळ भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असे म्हटले गेले आहे. भारतात अब्जाधीशांची संख्या १४०वर गेली आहे. त्यांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य ५९६ अब्ज डॉलर्स इतके आहे. गौतम आदानी यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. पहिल्या दहामध्ये अंबानी, अदानींशिवाय शिव नाडर, उदय कोटक, लक्ष्मी मित्तल, सुनील मित्तल, सायरस पूनावाला, राधाकिशन दमानी आदींचा समावेश आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संख्यावाढीचा वेगही वाढला आहे. गतवर्षी भारतात १०२ अब्जाधीश होते. त्यामध्ये एका वर्षात ३८ जणांची भर पडली आहे. जागतिकीकरणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती आल्याचाही हा परिणाम आहे. शिवाय उत्पादन क्षेत्रासोबत सेवाक्षेत्र व पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक वाढते आहे. त्याचाही हा परिणाम आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनाने अर्थव्यवस्थेच्या गतीला ब्रेक लागला होता. तरीदेखील आर्थिक व्यवहार आणि उत्पादनावर फारसा फरक पडलेला दिसत नाही. विकसित राष्ट्रांनी कोरोना संसर्गाच्या काळातदेखील अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, यासाठी वारंवार नवनवीन उपाय करून काळजी घेतल्याचा परिणाम आहे. चीनचा परकीय गंगाजळीतही जगात प्रथम क्रमांक आहे. त्यांच्या निर्यातीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीनच्या पाच शहरांत अब्जाधीश आहेत, त्या तुलनेने भारतात मुंबई या एकाच शहरात शंभर अब्ज संपत्ती असणारे लोक आहेत. रशियामध्ये मॉस्को, अमेरिकेत न्यू यॉर्कबरोबरच सॅनफ्रान्सिस्को, इंग्लंडची राजधानी लंडन या शहरांचा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश आहे.

आता गरिबीपेक्षाही श्रीमंती मोजण्याचेच दिवस आले असे वाटते; पण बेघर, अर्धपोटी लोकांची संख्या आदी आकडेवारी एकविसाव्या शतकातही मन विषण्ण करणारी वाटते. कोरोना संसर्गाच्या कालावधीत बेरोजगारांच्या संख्येचे खेळ खूप खेळले गेले. दावे-प्रतिदावे केले. परिणामी, कोणतीही विचारधारा असो, संपूर्ण जगाने आता भांडवलशाहीचा स्वीकार केल्याचे स्पष्ट दिसते आहे. विशेषत: सेवाक्षेत्राचा एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने संपत्तीत मोठी भर पडू लागली, तरीदेखील उत्पादन क्षेत्राचे महत्त्व कमी होत नाही. उत्पादनाचे तंत्र बदलले असेल, जागतिकीकरणामुळे जगभरच्या बाजारपेठा खुल्या झाल्याचाही परिणाम असेल. एक मात्र मान्य केले पाहिजे की, श्रीमंत किंवा श्रीमंती वाढविण्यास नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे दिवस मागे पडलेत. माॅस्को वा बीजिंगसह चीनमधील पाच शहरांतील उद्योजक, व्यावसायिक अब्जाधीशांच्या संख्येत अधिक असावेत, हाच खरा बदलाचा संकेत आहे. चीनचा कम्युनिस्ट असल्याचा दावाही आता फोल ठरला आहे. माॅस्कोनेे पूर्वीच आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलली आहे. सारे जग एका रेषेवर येते आहे, हाच यातून संदेश जातो. 

Web Title: Beijing now has more billionaires than any city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.