(फोटो : विजय माने १७)
परंडा : गतवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोना महामार्गाचे सावट असल्याने राज्य शासनाकडून पायी पालखी सोहळ्यावर बंदी आणण्यात आली आहे. मात्र येथील थोरबोले कुटुंबियांनी थोरबोले वस्तीवरील माऊली पालखी विसावास्थळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्रतिकात्मक पूजा करून आपली वारी परंपरा कायम राखली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मस्थळ असलेल्या आपेगाव येथून ज्ञानेश्वर महाराजांचा पंढरपूरच्या दिशेने निघणारा पालखी सोहळा दरवर्षी परंडा शहरानजीक थोरबोले वस्तीवरील माऊली विसावास्थळी येत असतो. या ठिकाणी थोरबोले परिवाराच्यावतीने पालखीतील वैष्णवांसाठी सकाळच्या न्याहरीची व्यवस्था केली जाते. विसावास्थळी ‘माऊली, माऊली’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पालखी नाचवून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन केले जाते. हा सोहळा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे थोरबोले बंधूंनी ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिकात्मक पादुकांचे शनिवारी ‘माऊली, माऊली’ च्या जयघोषात पूजन करून आपली वारी परंपरा कायम राखली.
थोडक्या माऊली भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी दीपक थोरबोले, महेश थोरबोले, ओंकार थोरबोले, आदित्य थोरबोले, रमेश थोरबोले, बाबूराव गायकवाड, संजय वैद्य, तय्यब मुजावर, अहेमद भोले, किशोर गिरी यांच्यासह भजनी मंडळाचे सदस्य व महिला भाविक उपस्थित होत्या.