धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती; शिंगोलीत उभारणार १०६ मीटरचा 'सिंगल स्पॅन' पूल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 20:10 IST2026-05-04T20:09:42+5:302026-05-04T20:10:15+5:30
राष्ट्रीय महामार्गावरून होणार रेल्वेचे क्रॉसिंग,मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती; शिंगोलीत उभारणार १०६ मीटरचा 'सिंगल स्पॅन' पूल!
धाराशिव : जिल्ह्याच्या विकासाची 'लाइफलाइन' समजल्या जाणाऱ्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्याकडे झेपावत आहे. या प्रकल्पात अभियांत्रिकीचा एक थक्क करणारा नमुना पाहायला मिळणार असून, शिंगोलीजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मध्य रेल्वेच्या इतिहासातील सर्वाधिक लांबीचा (१०६ मीटर) 'सिंगल स्पॅन' पूल उभारण्यात येत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून या ऐतिहासिक टप्प्याची माहिती दिली.
जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील सर्वात कठीण मानला जाणारा टप्पा म्हणजे शिंगोली येथील राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस करणारा रेल्वे पूल. या पुलाच्या दोन खांबांमधील अंतर तब्बल १०६ मीटर असून, एवढा मोठा 'सिंगल स्पॅन' असलेला हा मध्य रेल्वेचा पहिलाच पूल ठरेल. पुलाच्या उभारणीसाठी प्रगत ड्रिलिंग मशिनरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्या पायाभरणीचे काम सुरू असून, पुढील ८ ते ९ महिन्यांत पुलाचे लॉन्चिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आ. पाटील म्हणाले.
मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या ८४.४४ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाइन कामाच्या प्रगतीचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंगोली याठिकाणी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. या प्रकल्पाचा धाराशिव ते तुळजापूर हा पहिला टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. तर, सोलापूर ते तुळजापूर हा दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाणार आहे. यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पर्यटनात वाढ होईल, उद्योगांनाही गती येईल
धाराशिव रेल्वे स्थानकापासून शिंगोलीच्या दिशेने रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे तुळजापूर हे तीर्थक्षेत्र थेट रेल्वेने जोडले जाऊन धार्मिक पर्यटनात मोठी वाढ होईल. शिवाय दळणवळण सुलभ झाल्यामुळे स्थानिक व्यापारी आणि उद्योगांना मोठी गती मिळेल. सोबतच सोलापूर-धाराशिव प्रवासाचा वेळ देखील लक्षणीयरीत्या कमी होईल.
भाविकांचा प्रवास सुखकर होईल
या रेल्वे मार्गामुळे धाराशिवकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होत आहे. विशेषतः तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या देशभरातील कोट्यवधी भाविकांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि जलद होईल.
- आ. राणाजगजितसिंह पाटील, उपाध्यक्ष, 'मित्र' संस्था