अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:05 IST2026-05-05T13:04:28+5:302026-05-05T13:05:12+5:30
एका १६ वर्षीय मुलीच्या मोबाईलच्या वेडाने तिच्या कुटुंबाला इतकं हादरवून सोडलं की, त्यांना स्वतःच्याच मुलीवर नजर ठेवण्यासाठी प्रोफेशनल बाऊन्सर्सची मदत घ्यावी लागली.

अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
आजच्या युगात मुलं आणि स्मार्टफोन यांच्यातील नातं कोणापासूनही लपलेलं नाही. मात्र अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परिस्थिती किती भयावह असू शकते हे यातून समोर आलं आहे. एका १६ वर्षीय मुलीच्या मोबाईलच्या वेडाने तिच्या कुटुंबाला इतकं हादरवून सोडलं की, त्यांना स्वतःच्याच मुलीवर नजर ठेवण्यासाठी प्रोफेशनल बाऊन्सर्सची मदत घ्यावी लागली.
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या या मुलीला सोशल मीडिया आणि फोटो-शेअरिंग एप्सचं असं व्यसन होतं की, ती तासनतास अनोळखी लोकांशी गप्पा मारू लागली. धक्कादायक बाब म्हणजे ती घरातून गुपचूप ऑनलाईन भेटलेल्या अनोळखी व्यक्तींना खरोखर बाहेर भेटायला जाऊ लागली. पालकांनी जेव्हा तिचा मोबाईल काढून घेतला, तेव्हा तिचं वागणं अत्यंत हिंसक झालं आणि पालकांची चिंता अधिकच वाढली.
फोन हिसकावला तर घरातील सामान बाहेर फेकलं
जेव्हा पालकांनी मुलीला सुधारण्यासाठी फोन परत घेतला, तेव्हा तिने रागाच्या भरात आपल्या आईवर हल्ला केला आणि घरातील सामानाची तोडफोड सुरू केली. एका घटनेत तर तिने आपल्या हाय-राईज फ्लॅटच्या खिडकीतून टेलिव्हिजन आणि मायक्रोवेव्ह सारखी महागडी उपकरणं खाली फेकून दिली. डॉक्टर मृगेश वैष्णव यांच्या मते, अशा गंभीर परिस्थितीत औषधांसोबतच नीट देखरेखीचीही गरज होती.
४ बाउन्सर आणि ६५ हजारांचा खर्च
मुलीची सुरक्षा आणि तिचं वागणं नियंत्रित करण्यासाठी कुटुंबाने ४ बाऊन्सर्सना दोन शिफ्टमध्ये कामावर ठेवलं आहे. यासाठी ते दरमहा सुमारे ६५,००० रुपये खर्च करत आहेत. बाऊन्सर्सचं काम रात्रंदिवस मुलीवर नजर ठेवणं आहे, जेणेकरून ती पुन्हा कोणतंही धोकादायक पाऊल उचलणार नाही.
८ बाउन्सर तैनात
सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे की, आता अशी प्रकरणं वेगाने वाढत आहेत. सूरतमध्ये एका कुटुंबाने आपल्या १७ वर्षांच्या मुलाच्या गेमिंगच्या व्यसनासाठी ८ बाउन्सर तैनात केले होते. वडोदरा आणि राजकोटमध्येही पालक मुलांचे हिंसक वर्तन, अमली पदार्थ किंवा चुकीची संगत रोखण्यासाठी सुरक्षा सेवांचा आधार घेत आहेत, ज्याचा खर्च महिन्याला ५०,००० रुपयांहून अधिक येतो.
मानसिक आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे की, कोरोना महामारीनंतर डिजिटल अवलंबित्व खूप वाढलं आहे. डॉक्टर वैष्णव म्हणतात की, हे व्यसन आता अंमली पदार्थ किंवा दारूच्या व्यसनासारखंच धोकादायक आहे, जिथे पारंपारिक पद्धती काम करत नाहीत आणि मुलांना अनेक महिने रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते.