British Airways Taxi Pilot: जेव्हाही पायलट शब्द डोळ्यासमोर येतो, तेव्हा एक प्रतिमा तयार होते. ती म्हणजे तो विमान उडवतो आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जातो. पण विचार करा, असाही एखादा पायलट असू शकतो का जो विमान उडवणारच नाही, तरीही एअरलाईन्स त्याला लाखो रुपयांचा पगार देईल? ब्रिटिश एअरवेजनं (British Airways) अशाच पायलटांसाठी व्हेकन्सी काढली आहे.
ब्रिटिश एअरवेज एअरलाईन शिकागोच्या ओ'हारे इंटरनॅशनल एअरपोर्ट (Chicago O'Hare International Airport) वर पायलटांना वर्षाला १,००,००० डॉलर (सुमारे ९५ लाख रुपये) पगार देत आहे, पण अट ही आहे की त्यांना विमान उडवायचं नाहीये. पायलट्सचं काम केवळ रनवे आणि टर्मिनल दरम्यान विमान चालवून एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणं हे असेल.
कंपनीला का पडली 'टॅक्सी पायलट'ची गरज?
खरं तर, शिकागो एअरपोर्टवर ब्रिटिश एअरवेजचे ऑपरेशन थोडं वेगळं आणि गुंतागुंतीचं आहे, ज्यामुळे हे अनोखं पद काढण्यात आलंय. ब्रिटीश एअरवेजची फ्लाईट्स शिकागोच्या टर्मिनल ५ वर लँड करतात, जिथे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कस्टम आणि इमिग्रेशनची सुविधा आहे. एअरलाईन येथून दररोज ३ फ्लाईट्स ऑपरेट करते.
ज्या टर्मिनलवरून (टर्मिनल ५) विमान उतरतं, तिथून ते उड्डाण करत नाही. अशा परिस्थितीत लँडिंगनंतर विमान टर्मिनल ३ वर न्यावं लागतं, जिथून अमेरिकन एअरलाईन्सची देशांतर्गत उड्डाणं संचालित होतात.
ब्रिटिश एअरवेज आणि अमेरिकन एअरलाईन्स यांच्यात भागीदारी आहे. त्यामुळे विमान टर्मिनल ३ वर नेल्यामुळे प्रवाशांना आपली पुढची फ्लाईट पकडणं सोपं जातं. जर विमान टर्मिनल ३ जवळ उभं असेल, तर प्रवाशांचे कनेक्शन मिस होण्याचा धोका कमी होईल आणि एअरलाईनची वक्तशीरपणा अधिक चांगला होईल.
काम सोपं नाही
हे काम ऐकायला सोपे वाटत असले तरी, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक ओ'हारेच्या गुंतागुंतीच्या टॅक्सी-वे नेटवर्कवर बोईंग ७७७ आणि बोईंग ७८७ ड्रीमलाइनर सारख्या मोठ्या विमानांना सांभाळणं ही साधी गोष्ट नाही. म्हणूनच एअरलाईन या विमानांसाठी टॅक्सी पायलटची भरती करत आहे.
या असतील मुख्य जबाबदाऱ्या
टॅक्सी करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी करणं.
ग्राउंड कंट्रोलसोबत ताळमेळ बसवणं.
खराब हवामान आणि जड ट्रॅफिकमध्ये सुरक्षितपणे विमान टर्मिनलच्या दरम्यान नेणं.
लिंक्डइनवर केली पोस्ट
ब्रिटिश एअरवेजनं लिंक्डइनवर ही व्हेकन्सी २ मे रोजी पोस्ट केली होती. या पोस्टवर मंगळवारी सकाळी १०:३० वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार) ४३ लोकांनी अर्जही केले आहेत. ही व्हेकन्सी मुख्यत्वे त्या निवृत्त पायलटांसाठी डिझाइन केली आहे जे आता कमर्शियल उड्डाणं करू शकत नाहीत, पण त्यांना विमानांची खोलवर समज आहे. योग्य उमेदवाराकडे एक वैध एअर ट्रान्सपोर्ट पायलट सर्टिफिकेट आणि संबंधित विमान चालवण्याचा अनुभव असणं अनिवार्य आहे.
कोणासाठी चांगली आहे ही नोकरी?
९५ लाख रुपयांचे हे वार्षिक पॅकेज सीनियर अमेरिकन पायलट्सच्या तुलनेत बरंच कमी आहे. तरीही हे अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना कमी तणावासोबत एव्हिएशन सेक्टरशी जोडलेलं राहायचं आहे.
