LNG Supply News: पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर भारत आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करू इच्छित आहे. यासाठी 'लिक्विफाइड नॅचरल गॅस' (LNG) साठवणुकीसाठी नवीन टँक बांधण्याची तयारी सुरू करण्यात आलीये. पेट्रोनेट एलएनजी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. ही पावलं अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानली जात आहेत.
भारताचे एलएनजीवरील अवलंबित्व
भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या गरजांपैकी सुमारे ५० टक्के आयात करतो. याचा वापर वीज निर्मिती, खत उत्पादन, सीएनजी आणि घरगुती गॅस म्हणून केला जातो. हा वायू द्रव स्वरूपात कतार आणि अमेरिकेसारख्या देशांतून जहाजांद्वारे आणला जातो.
सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
कतार आणि यूएईमधून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम
देशातील नैसर्गिक वायूची मुख्य आयातदार कंपनी 'पेट्रोनेट एलएनजी'चे सीईओ ए. के. सिंह यांनी सांगितलं की, पश्चिम आशियातील संकटामुळे कतार आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) कडून होणारा पुरवठा प्रभावित झाला आहे. हा एकूण आयातीचा सुमारे ४० टक्के हिस्सा आहे. या परिस्थितीमुळे पर्यायी स्रोतांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच, पेट्रोनेट विविध टर्मिनल्सवर नवीन एलएनजी स्टोरेज टँक बांधून आपली साठवण क्षमता वाढवण्याची योजना आखतंय.
७ नवीन टँक उभारण्याची तयारी
सिंह यांनी माहिती दिली की, कंपनी ओडिशामधील गोपालपूर येथे दोन, केरळमधील कोच्ची येथे एक आणि गुजरातच्या दाहेजमध्ये अतिरिक्त स्टोरेज टँक स्थापित करण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पांना पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन वर्षे लागतील. एकूण सात नवीन टँक प्रस्तावित आहेत.
अतिरिक्त साठवण क्षमतेमुळे पुरवठा विस्कळीत झाला तरी वायूची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होईल, असंही सिंह यांनी नमूद केलं. "आमच्याकडे कामकाजाच्या दृष्टीने पुरेशी साठवणूक आहे, परंतु युद्धसदृश आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ती पुरेशी नाही," असं ते म्हणाले. सध्या देशातील २३ एलएनजी टँकपैकी १० टँक पेट्रोनेटच्या मालकीचे आहेत. याद्वारे २०२५-२६ मध्ये २.६५ कोटी टन एलएनजीचं व्यवस्थापन करण्यात आलं. यात दाहेज टर्मिनलवर आठ आणि कोच्चीमध्ये दोन टँकचा समावेश आहे.
भारताला करावी लागली कसरत
कतारच्या 'रास लाफान' प्लांटमधून होणारा एलएनजी पुरवठा २ मार्चपासून विस्कळीत झाला आहे. मार्च-एप्रिलमध्ये एकही खेप आली नाही आणि मे महिन्यातही पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. जून महिन्याबाबतही अद्याप अनिश्चितता आहे. सिंह यांनी सांगितले की, पुरवठा खंडित झाल्यामुळे प्राधान्य क्षेत्रांना (उदा. घरगुती एलपीजी आणि वाहतुकीसाठी सीएनजी) गॅस पोहोचवण्यासाठी औद्योगिक ग्राहकांच्या पुरवठ्यात कपात करावी लागली.
संकटकाळात स्पॉट मार्केटमध्ये एलएनजीच्या किमती वाढून प्रति युनिट २४-२५ डॉलर पर्यंत पोहोचल्या होत्या, ज्या आता कमी होऊन सुमारे १६ डॉलर वर आल्या आहेत. भारतात गॅसची मागणी किमतींनुसार बदलत असते; स्पर्धात्मक दर राहिल्यासच मागणी टिकून राहू शकते, असंही त्यांनी नमूद केलं.
