‘वीतभर’ परवान्यावर ‘हातभर’ उत्खनन; छत्रपती संभाजीनगर विभागात १८ टक्के महसूल ‘गळती’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:50 IST2026-04-16T15:45:47+5:302026-04-16T15:50:01+5:30
मराठवाड्याच्या तिजोरीत १०९८ कोटींचे उद्दिष्ट; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी, तर नांदेड-लातूर पिछाडीवर.

‘वीतभर’ परवान्यावर ‘हातभर’ उत्खनन; छत्रपती संभाजीनगर विभागात १८ टक्के महसूल ‘गळती’
- बाळासाहेब माने
धाराशिव : छत्रपती संभाजीनगर विभागाने गेल्या आर्थिक वर्षात १०९८ कोटींच्या उद्दिष्टापैकी ८१.६१ टक्के महसूल वसूल केला आहे. जमीन महसुलात धाराशिव जिल्ह्याने बाजी मारली असून, लातूर आणि नांदेडची कामगिरी खालावली आहे. दुसरीकडे, गौण खनिज क्षेत्रात परभणीने चांगली वसुली केली. मात्र, जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये प्रशासन सुस्त दिसले. दरम्यान, अनेक जिल्ह्यात ‘वीतभर’ जागेच्या परवान्यावर ‘हातभर’ उत्खनन केल्याने शासनाचा १८.३९ टक्के महसूल बुडाला आहे.
गत आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर विभागाला जमीन व गौण खनिज महसूल वसुलीचे १०९८ कोटी १२ लाखाचे उद्दिष्ट होते. ३१ मार्चपर्यंत ८९६ कोटी २३ लाख रुपये म्हणजेच ८१.६१ टक्के वसुली झाली आहे. यात जमीन महसुलाच्या २८६ कोटींच्या उद्दिष्टापैकी १४६ कोटी (५४.४९ टक्के) वसुली झाली. यामध्ये नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची कामगिरी खालावली आहे. मात्र, धाराशिवने उल्लेखनीय काम केले. गौण खनिज महसुलात ८३० कोटींच्या उद्दिष्टापैकी ७५० कोटी म्हणजे ९०.३७ टक्के वसुली केली आहे.
जमीन महसुलात धाराशिवची आघाडी
जमीन महसुलात दिलेल्या उद्दिष्टापैकी धाराशिव जिल्ह्याने सर्वाधिक ७४.९६ टक्के वसुली केली आहे. यामध्ये सर्वांत कमी नांदेड ३१.५६ टक्के, तर लातूर ४४.७८ टक्क्यांत आहेत.
गौण खनिज वसुली, परभणीचा ‘ओव्हरफ्लो’
गौण खनिज उद्दिष्टाच्या तुलनेत परभणी जिल्ह्याने चांगली कामगिरी करत १४७.४६ टक्के वसुली केली आहे. गौण खनिज वसुलीत विभागातील इतर काही जिल्ह्यांनी उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली केली आहे, तर धाराशिव या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
जिल्हानिहाय उद्दिष्टे अन् वसुली
जिल्हा - जमीन महसूल उद्दिष्ट - वसुली - टक्के - गौण खनिज उद्दिष्ट - वसुली - टक्के
छ.संभाजीनगर - ७२८५.९५ - ३८८६.९५ - ५३.३५ - १५०००.०० - ११०२३.८३ - ७३.४९
जालना - २४१६.५७- १६८३.३३-६९.६६ -९०००.०० -६५४८.२१- ७२.७६
परभणी - १५३२.१०- ९६०.५८-६२.७०-९५००.००-१४००८.३५-१४७.४६
हिंगोली - १३०९.७९-८४०.०८-६४.१४-६०००.००-५४२६.५६-९०.४४
नांदेड - ५००१.३८-१५७८.३०-३१.५६-१८०००.००-१६८७०.३४-९३.७२
बीड - २८६८.५७-१९९८.२०-६९.६६-१३०००.००-९९९५.०२-७६.८८
लातूर - ३७५७.८८- १६८२.९२- ४४.७८-५५००.००-५७१४.६५-१०३.९०
धाराशिव - २६४३.८०-१९८२.०२-७४.९७-७०००.००-५४२४.००-७७.४९
मायक्रो प्लॅनिंग केली
धाराशिव जिल्हा छोटा असताना मराठवाड्यात जमीन महसूल वसुलीत पहिल्या क्रमांकवर आहेत. एनए, सिलिंग जमिनीचे नियम बदलल्याने महसूल घटला. गौण खनिजातील तूट भरून काढण्यासाठी आगामी काळात मायक्रो प्लॅनिंग केली आहे.
- विद्याचरण कडवकर, निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव.