(फोटो : तेरखेडा न्यूज १५)
तेरखेडा : वाशी तालुक्यातील तेरखेडा-सटवाईवाडी रोडची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. तेरखेड्यापासून ४ कि.मी. अंतरावर सटवाईवाडी गाव असून, या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. प्रत्येक निवडणुकीच्यावेळी लोकप्रतिनिधी रस्ता दुरुस्तीची आश्वासने देतात; मात्र नंतर इकडे कुणीही फिरकत नाही, असा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. या ४ कि.मी.च्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, काही ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजू दोन ते तीन फूट खचलेल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय, खचलेल्या रोडमुळे चारचाकी वाहन जातच नाही. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्याने अनेक ठिकाणी पाणीही साचल्याचे दिसून येते.
दरम्यान, तेरखेडा-सटवाईवाडी रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेदेखील दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सरपंच योगीराज फरताडे यांनी केली.
कोट...
तेरखेडा-सटवाईवाडी रोडची दुरवस्था झाल्याने रिक्षा, मोटारसायकल चालविणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहने उलटून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
- युवराज बाबर, वाहनचालक.