कळंब : एकीकडे व्यावसायिकांनी टाकलेलं ‘वेस्टेज’, पडलेली मृत जनावरे, त्याचे लचके तोडणारी भटकी कुत्री आणि या सर्वांमुळे सुटणारी दुर्गंधी यामुळे कळंब शहरालगत असलेल्या तांदूळवाडी रोडवरील शंभरावर कुटुंबांच्या ‘नाकीनऊ’ आले आहेत. एकीकडे दुर्गंधीमुळे नाकाला रूमाल लावतानाच दुसरीकडे भटक्या कुत्र्यांपासून स्वत:चे संरक्षण करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, तीन गावच्या कारभाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे आता दाद तरी नेमकी कोणाकडे मागावी, असा संतापजनक सवाल स्थानिक करत आहेत.
शहरातून मार्गस्थ झालेल्या कळंब येडशी राज्य मार्गावर तांदूळवाडीलगत काही नागरी वस्ती उभा राहिल्या आहेत. सर्व्हे क्रमांक ११३, २०५ व २०६ मध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या भूखंडांवर अनेकांंनी आपली घरे बांधली आहेत. एरव्ही प्रशस्त म्हणून गणला जाणारा हा भाग सध्या दुर्गंधी, अस्वच्छतेच्या समस्यांमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. हा त्रास कळंब शहरातील लोक, व्यावसायिक, कळंब नगर परिषद, डिकसळ व तांदूळवाडी ग्रामपंचायत यांच्यामुळे होत असल्याचा स्पष्ट आरोप रहिवासी करीत आहेत. केशकर्तनालयातील केस, मांस विक्री दुकानातील वेस्टेज, मृत जनावरे व इतर कचरा याठिकाणी टाकण्यात येत असल्याने एकप्रकारे हा भाग ‘ डम्पिंग ग्राऊंड’कडे वाटचाल करत आहे. या अस्वच्छतेमुळे साहजिकच मोकाट कुत्रे, मांजर, वराह यांचा वावर वाढला असून, ही बाब नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ही जनावरे अनेकदा चालत्या वाटसरूंच्या, वाहनधारकांच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडले आहेत. गतवर्षी यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. यानंतर ग्रामपंचायत, नगर परिषदेला पत्रही निघाले होते. तांदूळवाडी ग्रामपंचायतीने ‘निर्बंध’ दर्शवणारा एक फ्लेक्सही या भागात लावला होता. मात्र, अवघ्या काही दिवसात ना तो फ्लेक्स राहिला, ना समस्या सुटली.
चौकट....
१४० नागरिकांची प्रशासनाकडे धाव
यासंदर्भात स्थानिक नागरिक अशोक डिकले, बापू भंडारे, सतीश डिकले, पप्पू मडके, ॲड. धालगडे, महादेव सुतार, आनंद रणदिवे यांच्यासह १४० नागरिकांनी एसडीओ, बीडीओ, नगर परिषद, डिकसळ, तांदूळवाडी ग्रामपंचायत, पंचायत समिती उपसभापती यांना निवेदन दिले आहे. यात अस्वच्छता, दुर्गंधी, मोकाट प्राण्यांचा वावर आता असह्य झाला आहे. त्यामुळे याचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी आग्रही मागणी केली आहे.
नेमकी दाद मागावी कोणाकडे ?
तांदूळवाडी रोडवरील ही नागरी वस्ती कळंब, डिकसळ व तांदूळवाडी या तीन गावच्या शिवेवर आहे. काहींची घरे कळंब, काहींची डिकसळ तर काहींची तांदूळवाडी हद्दीत येत असली तरी यांना तसं ‘कळंबकर’ म्हणूनच ओळखले जाते. या स्थितीत त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ अशीच संतापजनक अनुभूती येत आहे.