कळंब : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी गावातील आजारी बालकांकडे दुर्लक्ष न करता त्यांची तपासणी करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ अभिजित लोंढे यांनी केले.
येथील पं.स. सभागृहात इंडियन मेडिकल असोसिएशन, उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आशावर्कर व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या कोविड तिसरी लाट व बालकांचे आरोग्य याबाबत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. लोंढे यांनी मार्गदर्शन केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाची तिसरी लाट बालकांना जास्त प्रमाणात बाधित करेल, असे गृहीत धरून शासन सध्या उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही उजळणी कार्यशाळा आयोजित केली होती. कोरोनाचा धोका लवकर ओळखणे, पालकांचे मानसिक सबलीकरण करणे, लवकरात लवकर आजारी बालकांना दवाखान्यात हलविणे, घरातील आजारी ज्येष्ठ मंडळीपासून बालकांना दूर ठेवणे आदी विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. वायदंडे, डॉ. जाधव यांनी लसीकरण, कोविड उपचार यावर यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी दत्ता कुचेकर, अक्षय वाघमारे आदींनी पुढाकार घेतला.