उस्मानाबाद : घटस्फोटाच्या प्रकरणातील वकीलपत्र काढून घेण्याची धमकी देत उस्मानाबादेत वकील असलेल्या मेहुण्यावर डॉक्टरच्या सांगण्यावरून दोघांनी जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी तिघांवर आनंदनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून, याप्रकरणात आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय सोमवारी विधिज्ञ मंडळाने घेतला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील रहिवासी असलेले ॲड. प्रथमेश सौदागर मोहिते हे त्यांची बहीण डॉ. कांचन मोरे व दोन मुली या न्यायालयीन कामकाजासाठी उस्मानाबादेत न्यायालयात गेल्या होत्या. आरोपी डॉ. अरुण मोरे व ॲड. प्रथमेश मोहिते यांची बहीण डॉ. कांचन मोरे यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. मागील तारखेस भेटण्याच्या वेळेच्या कारणावरून डॉ. मोरे याने गोंधळ घातला होता. त्यामुळे ॲड. मोहिते यांनी केवळ न्यायालयीन वेळेतच मुलींना भेटण्याची परवानगी डॉ. मोरे यास देण्याबाबत न्यायालयात अर्ज दिला. न्यायालयीन कामकाज संपवून ॲड. मोहिते न्यायकक्षाबाहेर आले असता, डॉ. अरुण मोरे यांनी अन्य दोघांसमवेत तू माझ्या विरोधातील वकीलपत्र काढून घे व माझ्या केसमध्ये लक्ष घालू नको, नाही तर तुझे आज कामच करतो, अशी धमकी दिली. तेव्हा ॲड. मोहिते यांनी वकीलपत्र काढून घेणार नसल्याचे सांगितले व बहिणीसह येडशीकडे त्यांच्या वाहनातून निघाले. दरम्यान, दुचाकीवरून दोघेजण त्यांच्या वाहनाचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहन महामार्गाकडे वळवून ते पुढे निघाले, तरीही आरोपींनी त्यांना गाठलेच. दुचाकी आडवी लावून या दोघांनी पुन्हा धमकी देत वाहनावर दगडफेक केली. यात ॲड. मोहिते यांना जबर मार लागून ते जखमी झाले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या घटनेचा सोमवारी जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने बैठक घेऊन निषेध करण्यात आला. या बैठकीतच तिन्ही आरोपींचे वकीलपत्र कोणीही न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. नितीन भोसले यांनी दिली.