उमरगा : डिग्गी येथे चालणाऱ्या अवैध व्यवसायाच्या विरोधात रणरागिणींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गावातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी लावून धरल्यानंतर त्यांना गावातील युवकांची साथ लाभली. याची दखल घेत पोलीस निरीक्षकांनी भर पावसात डिग्गी गावातील हातभट्टी दारू व शिंदी विक्रीच्या दुकानावर छापा टाकला. तसेच ग्रामस्थांची बैठक घेऊन दारूविक्रीला लगाम घातला जाईल, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील डिग्गी हे शेवटचे गाव. मागील कित्येक वर्षांपासून हातभट्टी दारू व शिंदी विक्रीमुळे गावाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून, कित्येक जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. हा प्रश्न दिवसागणिक गंभीर हाेऊ लागल्यानंतर गावातील रणरागिणींनीच दारूविक्रीविराेधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या पुढाकारास गावातील तरुणांचेही तितकेच खंबीर बळ मिळाले. याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक राैशन यांनी घेतली होती. राैशन यांच्या निर्देशानंतर पाेलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी बुधवारी रात्री भरपावसात डिग्गी येथील अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टी व शिंदी विक्रीच्या दुकानावर छापा मारला. यावेळी डिग्गी ग्रामस्थांसोबत बैठक घेत त्यांना यापुढे अवैद्य दारू व शिंदी विक्री होणार नाही, अशा शब्दांत आश्वस्त केले. याप्रसंगी डिग्गी गावचे सरपंच संतोष कवठे, माजी उपसरपंच वामन गायकवाड, रोटरीचे माजी सचिव प्रा. युसूफ मुल्ला, प्रवीण स्वामी यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सरपंच संतोष कवठे, प्रा. युसूफ मुल्ला, प्रवीण स्वामी, मधुकर गायकवाड, युवराज गायकवाड यांनी मनाेगत व्यक्त केले. अवैध व्यवसायाला लगाम घालण्यासाठी पाेलीस निरीक्षक अघाव यांनी गावातील महिला व युवक अशा ३५ जणांची टीम स्थानक केली. या बैठकीत वीरेश जमादार, जीवन एकंबे, सतीश बालकुंदे, संग्राम बेडगे, दशरथ गायकवाड, रघुनाथ गायकवाड, सुभाष गायकवाड, दिगंबर गायकवाड, रामराजा गायकवाड, राजाराम पाटील, बसवराज पाटील, षडाक्षरी हिरेमठ, प्रशांत डिग्गीकर, रियाज पठाण, मौलाली शेख, रसूल शेख, पिंटू हेबळे, मारुती गायकवाड, राजेंद्र गायकवाड, गुरुनाथ मंठाळे, गुरुबसाय्या स्वामी, सतीश कलशेट्टी, सुनील कांबळे, आदी सहभागी झाले हाेते.
चाैकट...
भरपावसात ग्रामस्थांसह पोलीस निरीक्षकांची दारू दुकानाला धडक
पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी बुधवारी (दि. २१) रात्री डिग्गी येथे शिंदी, हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापेमारी केली. यावेळी त्यांच्या पथकाने मुद्देमालही जप्त केला आहे. यापूर्वीही जवळपास चारवेळा कारवाई करण्यात आल्या. आजवरच्या कारवाईत दहाजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १२ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकात पाेलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, पोलीस नाईक प्रताप बांगर, अतुल जाधव, विष्णू मुंढे, पाेलीस कॉन्स्टेबल जगन काळे, नितीन पाटील, सुखदेव झाटे, किशोर राऊत, बबिता चव्हाण व संभाजी घुले, आदींचा समावेश हाेता.