पत्र्याचे शेड तोडून शेळी-बोकड पळविले
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराजवळील जाधववाडी तांडा येथे चोरीची घटना घडली आहे. येथील मनिष महादेव सोनकवडे यांचे त्यांच्या चुलत्याच्या घरासमोर पत्र्याचे शेड आहे. त्यात एक शेळी व दोन बोकड होते. रात्रीच्या सुमारास चोरट्याने पत्र्याचा कडीकोयंडा तोडून आतील शेळी व दोन्ही बोकड चोरुन नेले. याप्रकरणी सोमवारी देण्यात आलेल्या तक्रारीनुसार उस्मानाबाद ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल उघडे ठेवल्याने तिघांवर गुन्हा
उस्मानाबाद : कोविडच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स तसेच अन्य आस्थापनांना चार वाजेपर्यंत त्या सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तरीही परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथील बाबासाहेब हनुमंत बिबे व लक्ष्मण संभाजी मांडवे यांनी त्यांचे हॉटेल्स तर अनाळा येथील सुमनेशकुमार श्रीबखेडीसिंह यादव यांनी त्यांचे स्वीटमार्ट वेळ संपल्यानंतरही उघडेच ठेवले होते. याप्रकरणी उपरोक्त तिघांवर आंबी पोलिसांनी कारवाई करीत सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्यात लावली दुचाकी, वाहनधारकावर गुन्हा
उस्मानाबाद : पुणे येथील अथर्व सुनील कुलथे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी ही परंडा शहरातील बार्शी रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल, अशी लावली होती. रस्त्यातच दुचाकी थांबविल्याने अपघात होऊन जीवितास धोका होण्याची शक्यता असल्याचे परंडा पोलिसांना दिसून आल्यानंतर त्यांनी कारवाई करीत संबंधित व्यक्तीवर सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.