उस्मानाबाद : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरताच आता झिका व्हायरसने तोंड वर काढले आहे. या विषाणूंचा प्रसार एडीस मच्छरांपासून होत असल्याचे संशोधनातून पुढे आले. या विषाणूच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, आरोग्य विभागाने जिल्ह्यास सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोविड-१९ संपण्यापूर्वीच झिका विषाणूचा प्रसार इतर राज्यांतील काही भागात सुरू झाला आहे. डेंग्यू, चिकुणगुण्यासारखा हा आजार असला तरी जीवघेणा असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. हा व्हायरस एडीस डासांपासून होत असल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. या विषाणूची उत्पत्ती ही टाकाऊ टायर, वस्तू, सडलेल्या झाडाचे बुंधे, साचलेल्या पाण्याचे डबके यातून होत असल्याने नागरिकांनी कोरडा दिवस पाळणे, टाकाऊ वस्तू फेकून देणे, आजूबाजूचा परिसर साफसफाई करणे, नाली साफसफाई ठेवणे गरजेचे आहे.
कशामुळे होतो?
झिका व्हायरसचा आजार हा डेंग्यूप्रमाणेच डासापासून होतो. डास चावल्यानंतर झिका आजाराची लागण होते. त्यामुळे डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
झिका व्हायरसची लक्षणे काय
ताप
त्वचेवर लाल रंगाचे डाग
डोकेदुखी
सांधेदुखी
डोळे लाल होणे
उपाययोजना काय
सध्या झिका व्हायरसवर कोणतीही लस किंवा ठोस उपचार नाहीत. झिका व्हायरस आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम करतो. अशा परिस्थितीत स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे आणि त्यापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच त्यावर योग्य उपाय आहे.
कोट...
डेंग्यूप्रमाणेच झिका व्हायरसदेखील डासापासूनच पसरतो. डासाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही केली जात आहे. नागरिकांनीही डासाची उत्पत्ती होऊ नये, याची खबरदारी घ्यावी.
डॉ. एम. आर. पांचाळ,
जिल्हा हिवताप अधिकारी