कळंब नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी पालिका सभागृहात नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी शैला डाके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सभा दरम्यान विषय पत्रिकेवरील २७ विषय व अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळेचे दोन असे २९ विषय सर्वसंमतीने मंजूर झाले.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेत सर्व्हे क्र. ७ ब/२ मध्ये ईदगाह मैदान विकसित करणे, आरक्षण क्रं. १४ मध्ये शिवसृष्टी उभारणे, संत रविदास महाराज मंदिरासाठी सर्व्हे क्रं. ९७/ ब अथवा सर्व्हे क्र.१०२ मध्ये जागा देणे, पंडित जवाहरलाल नेहरू बालोद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा हाॅल बनवून देणे, नगरपालिका वाचनालय जवळ महिला व्यायामशाळा उभारणे, मल्टिपर्पज हाॅलचे भूमिपूजन व पुढील किरकोळ कामे करणे, रूद्र कलेक्शन जवळील चौकास वीर जिवाजी महाले यांचे नाव देणे, शहरात वृक्षारोपण करणे तसेच वृक्ष संगोपनाची हमी देणाऱ्या नागरिकांसाठी वृक्ष व ट्री गार्ड जाळी पुरवणे, शहरात ठिकठिकाणी ज्येष्ठ व इतर नागरिकांसाठी सिमेंट बाकडे बसवणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०५३ पर्यंत शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होण्यासाठी विस्तृत व अधिक क्षमतेने पाणीसाठा व वितरण करणारी ५७ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना नगराेथान महाअभियान योजनेतून कार्यान्वित करणे आदी विषय मंजूर करण्यात आले. सभेस माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, राष्ट्रवादीचे गटनेते लक्ष्मण कापसे, अमर गायकवाड, मुश्ताक कुरेशी, अनंत वाघमारे, सुभाष पवार, सतीश टोणगे, इंदुमती हौसलमल, साधना बागरेचा, गीता पुरी, अश्विनी शिंदे, सुरेखा पारख, छाया आष्टेकर, सरला सरवदे उपस्थित होते. नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, सभेला कार्यालयीन अधीक्षक दीपक हारकर, नगर अभियंता पार्वती कदम, विद्युत अभियंता कौस्तुभ रोकमवार, अभियंता तन्मय कुलकर्णी, सुशील शेळके, जगन्नाथ बावळे, सुधीर चोंदे, त्रिंबके, गोविंद रणदिवे आदी उपस्थित हाेते.