फरसा बाबाची गो-तस्करांनी हत्या केली? तणाव निर्माण होताच पोलीस अधीक्षकांनी सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:07 IST2026-03-21T14:05:57+5:302026-03-21T14:07:44+5:30
मथुरेत फरसा बाबा मृत्यू प्रकरणाचा गो-तस्करांशी संबंध लावल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी फरसा बाबा मृत्यूचे वेगळे कारण सांगितले आहे.

फरसा बाबाची गो-तस्करांनी हत्या केली? तणाव निर्माण होताच पोलीस अधीक्षकांनी सांगितले कारण
मथुरेतील कोसीकला पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रशेखर ऊर्फ फरसा बाबाच्या मृत्यू प्रकरणावरून तणाव निर्माण झाला आहे. गो-तस्करांनी गोरक्षक फरसा बाबाची हत्या केल्याचा आरोप करत लोकांनी संताप व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. पोलीस अधीक्षकांनी या घटनेचे नेमके कारण सांगितले.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांनी फरसा बाबा मृत्यूप्रकरणाबद्दल सांगितले की, "ही घटना रात्री ३ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली आहे. बाबांनी नागालँडची नंबर प्लेट असलेल्या एका कंटेनरला थांबवले होते. पण, त्यावेळी धुके खूप होते. दृश्यमानता कमी असल्याने राजस्थानचा नंबर असलेल्या एका ट्रकची फरसा बाबाला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला."
गो-तस्करांनी हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळला
पोलिसांनी सांगितले की, "नागालँडची नंबर प्लेट असलेल्या कंटनेरमध्ये साबण, कपडे धुण्याचा सोडा आणि किराणा सामान होते. राजस्थान नंबर प्लेट असलेल्या ट्रकमध्ये तारा होत्या. या घटनेत ट्रक चालक आणि क्लिनर, जे राजस्थानातील अलवर येथील रहिवाशी आहेत, ते जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेशी गो-तस्करीचा कोणताही संबंध नाही."
रस्ता रोको, दगडफेक करणाऱ्यावर कारवाई होणार
फरसा बाबाच्या मृत्यूचे वृत्त परिसरात पसरताच लोकांची गर्दी वाढत गेली. गो-तस्करांनी हत्या केल्याची अफवा पसरली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने रास्तो रोको केला आणि त्यानंतर तुफान दगडफेक केली.
दिल्ली-आग्रा महामार्गावर ही घटना घडली. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितले की, लाठीमार करत जमावाला पांगवण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात असून, दगडफेक करणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे.
फरसा बाबाच्या मृत्यूनंतर मथुरेत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश योगींनी दिले आहेत.
गो-तस्करांनी जाणीवपूर्वक फरसा बाबा यांना चिरडून मारल्याची माहिती चुकीची आहे. दाट धुके असल्याने आणि ट्रक चालकाला न दिसल्याने ही घटना घडली आहे. दोन्ही ट्रकममध्ये सामान मिळाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.