"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:16 IST2026-04-15T11:14:43+5:302026-04-15T11:16:23+5:30
बंगळुरुमध्ये आईनेची मुलीची हत्या करुन स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
Bengaluru Crime: एकत्र जेवण, क्रिकेटचा आनंद घेतला आणि काही तासांतच होत्याचे नव्हते झाले. बंगळुरूच्या व्हाईटफील्ड परिसरात एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या १३ वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
भविष्याची चिंता आणि नैराश्य
सुवर्णा चंद्रशेखर (४५) आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह घरात सापडला. तपासानुसार, सुवर्णा या गेल्या काही काळापासून गंभीर नैराश्यात होत्या. माझ्या नंतर माझ्या मुलीचा सांभाळ कोण करेल? या काळजीतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. तसेच, पती चंद्रशेखर यांना असलेल्या हृदयाच्या आजारामुळेही त्या प्रचंड तणावात होत्या.
घटनेपूर्वीचे ते शेवटचे तास
तपासात समोर आलेली माहिती अतिशय अस्वस्थ करणारी आहे. सोमवारी रात्री कुटुंबाने एकत्र बसून क्रिकेट मॅच पाहिली आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले.घरी परतल्यानंतर सुवर्णा यांनी पतीला मी खूप थकले आहे, उद्या सकाळी नाश्ता बनवणार नाही, असं सांगितले होते. मंगळवारी सकाळी पती चंद्रशेखर नाश्ता बाहेर करून कामावर निघून गेले. त्यांनी वारंवार फोन करूनही सुवर्णा यांनी फोन उचलला नाही, तेव्हा त्यांनी आपल्या भावाला घरी पाठवले. सकाळी ११ च्या सुमारास खिडकीतून पाहिले असता, सुवर्णा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या, तर मुलगी बेडवर मृतावस्थेत होती.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सुवर्णा यांनी आधी गाढ झोपेत असलेल्या मुलीचे तोंड उशीने दाबून तिचा श्वास रोखला. मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी स्वतः छताच्या पंख्याला लटकून आयुष्य संपवले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
दरम्यान, पती चंद्रशेखर यांनी आपल्या पत्नीविरुद्ध स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याची तक्रार दिली आहे. दुसरीकडे, सुवर्णा यांचे भाऊ मंजुनाथ यांनी या मृत्यूवर संशय व्यक्त करत दुसरी तक्रार दाखल केली आहे. यामागे काही दबाव होता का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.