मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:05 IST2026-05-15T14:04:02+5:302026-05-15T14:05:24+5:30

एका अल्पवयीन मुलाने आपल्या शिक्षिका आईच्या बँक खात्यातून ३३ लाख रुपये शेजाऱ्याला पाठवले. शेजाऱ्याने या पैशातून कार आणि दागिने खरेदी केले.

Paying for a mobile phone became expensive! A minor boy sent 33 lakhs to his neighbor from his mother's account and what happened next.. | मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 

AI Generated Image

मोबाईल फोन मुलांच्या हातात देणे पालकांसाठी किती महागात पडू शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार बिहारची राजधानी पटना येथे समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलाने गेम खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या बहाण्याने आईचा मोबाईल घेऊन तिच्या बँक खात्यातून चक्क ३३ लाख रुपये शेजाऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर केले. तब्बल पाच महिने हा प्रकार सुरू होता. पण, जेव्हा शिक्षिका असलेल्या या महिलेच्या मोठ्या मुलाने बँकेचे स्टेटमेंट तपासले, तेव्हा हे भयानक वास्तव समोर आले आणि कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.

आई शाळेतून येताच मोबाईलवर डल्ला

ही घटना पटना येथील राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित महिला एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती जेव्हा जेव्हा शाळेतून घरी परतायची, तेव्हा तिचा लहान मुलगा तिच्याकडून मोबाईल घ्यायचा. आईला वाटायचे की, मुलगा मोबाईलवर काहीतरी पाहत असेल, पण याच दरम्यान तो हुशारीने आईच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करत होता.

एमबीबीएस करणाऱ्या मोठ्या लेकाने उघडले गुपित

या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा अत्यंत रंजक आणि तितकाच धक्कादायक पद्धतीने झाला. महिला शिक्षिकेचा मोठा मुलगा, जो बाहेर राहून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे, तो काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने सहज म्हणून आईच्या मोबाईलवरून बँक अकाउंट तपासले. बँक स्टेटमेंट पाहताच त्याचे डोळे पांढरे झाले. खात्यातून तब्बल ३३ लाख रुपयांचे व्यवहार झाले होते आणि इतकेच नाही तर खात्यावर परस्पर लोन देखील घेण्यात आले होते. त्याने तातडीने ही माहिती आईला दिली.

शेजाऱ्याने खरेदी केली कार अन् दागिने

महिलेने तातडीने बँकेत धाव घेऊन सविस्तर स्टेटमेंट काढले असता, हे सर्व पैसे त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या अनिल नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. शेजाऱ्याने या निष्पाप अल्पवयीन मुलाला फूस लावून आणि वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून हे पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले होते. या चोरीच्या पैशांवर शेजाऱ्याने प्रचंड मौज-मजा केली. त्याने नवीन कार खरेदी केली, सोन्या-चांदीचे दागिने घेतले आणि तो बनारसला फिरायलाही जाऊन आला.

पोलिसांत गुन्हा दाखल, मुलाने केली चूक कबूल

पीडित महिला शिक्षिकेने या प्रकरणी शेजारी अनिल, त्याचा भाऊ आणि मुलाच्या विरोधात राजीव नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जेव्हा त्या अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली, तेव्हा त्याने रडत "माझ्याकडून चूक झाली," एवढेच सांगितले. मात्र, पोलिसांनी बँक ट्रान्झॅक्शन आणि मोबाईल जप्त केला असून, मुलाला नक्की काय आमिष दाखवले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Paying for a mobile phone became expensive! A minor boy sent 33 lakhs to his neighbor from his mother's account and what happened next..